क्रमवारीत सर्वोत्तम कसोटी गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू
भारताचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने वर्षांअखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत कसोटी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू या दोन्ही विभागांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
अश्विनने २०१५ या वर्षांमध्ये नऊ कसोटी सामन्यांमध्ये ६२ बळी मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याने तब्बल ३१ बळी मिळवले होते. १९७३ साली बिशनसिंग बेदी यांच्यानंतर वर्षांअखेरीस अव्वल कसोटी गोलंदाज ठरण्याचा मान अश्विनला मिळाला आहे. कसोटी गोलंदाजाबरोबरच सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा मानही अश्विनने पटकावला आहे.
गोलंदाजांच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन अव्वल स्थानावर होता. त्याला मागे सारत अश्विनने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
वर्षांच्या सुरुवातीला अश्विन १५व्या स्थानी होता, त्यानंतर वर्षभरात नेत्रदीपक कामगिरी करत अश्विनने अव्वल स्थान पटकावले आहे.
कसोटी गोलंदाजांच्या यादीत भारताचा रवींद्र जडेजा सहाव्या स्थानी आहे. कसोटी फलंदाजांच्या अव्वल २० जणांच्या यादीत भारताच्या अजिंक्य रहाणेलाच स्थान मिळू शकले आहे. या क्रमवारीमध्ये अजिंक्य अकराव्या स्थानी आहे.
यंदाच्या वर्षांत सर्वोत्तम कसोटी गोलंदाज ठरणे हा माझ्यासाठी सुवर्णयोग आहे. गेल्या १२ महिन्यांमधल्या मेहनतीचे फळ आहे. यासारखा वर्षांचा सुरेख शेवट होऊ शकत नाही.
-रविचंद्रन अश्विन

Story img Loader