२०२०-२१ मधील भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यावेळी झालेल्या सिडनी कसोटी दरम्यान, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रेक्षकांनी वर्णद्वेषी शिवीगाळ केली होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही वादग्रस्त कसोटी मालिका २-१ ने जिंकली होती. त्या मालिकेवर ‘बंदों में है दम’ नावाचा माहितीपट तयार करण्यात आला आहे. या माहितीपटाच्या लाँचिंगच्या कार्यक्रमामध्ये तत्कालीन कसोटी कर्णधार अंजिक्य रहाणेने आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील काही चांगल्या-वाईट आठवणी सांगितल्या आहेत. या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान आपण किती शारीरिक वेदना सहन केल्या होत्या, याचा खुलासा अश्विनने केला आहे.

रविचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतासाठी ‘सुपरहीरो’ ठरले होते. सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील सामना अनिर्णित ठेवण्याची ऐतिहासिक कामगिरी भारताने केली होती. या जोडीने २५९ चेंडूंचा सामना करत नाबाद ६२ धावांची भागीदारी केली होती. विहारीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती तर अश्विन देखील पाठदुखीच्या समस्येने त्रस्त होता. असे असूनही दोघांनी मैदान सोडले नव्हते.

रविचंद्रन अश्विनने एएनआयला सांगितले, “फलंदाजीमध्ये महत्त्वाची भागीदार भागीदारीमागे विहारी आणि माझ्यामध्ये असलेला चांगला संवाद फायद्याचा ठरला. आम्ही जेव्हा एकमेकांशी चर्चा केली तेव्हा आम्हाला काय समस्या आहे हे समजले. स्नायू ताणले गेल्यामुळे तो पुढे येऊन बॅकफूटवर जाऊ शकत नव्हता. तर, माझ्याही पाठीमध्ये वेदना होत्या. पण, आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. काहीवेळा विहारीने वेगवान गोलंदाजांचा सामना केला आणि मी फिरकीपटूंचा सामना केला. अशा पद्धतीने आम्ही दोन षटके फलंदाजी केली.”

सिडनीमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे अश्विनला गाबा येथे झालेल्या कसोटीला मुकावे लागले होते. त्याबद्दल अश्विनने सांगितले की, ‘सिडनी कसोटीनंतर त्याची अवस्था फारच वाईट झाली होती. असह्य वेदनांमुळे तो अक्षरश: जमीनीवर लोळत होता. उभे राहण्यासाठी सुद्धा त्याला त्याची पत्नी आणि मुलींचा आधार घ्यावा लागत होता.’

२०२०-२१मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी आणि संघातील प्रत्येक खेळाडूसाठी विशेष ठरली होती. पण, रविचंद्रन अश्विनसाठी ती जास्त विशेष ठरली. दुखापतग्रस्त असूनही त्याने अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या कामगिरीमध्ये मोलाचे योगदान दिले होते.

Story img Loader