Very talented players in Pakistan according to Ashwin: आशिया चषक २०२३ स्पर्धेला बुधवार पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला खेळणार आहे. याआधी भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. आश्विनच्या मते, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यासारखे खेळाडू असताना पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेत पराभूत करणे आव्हानात्मक असेल.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगताना रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “जर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी चांगल्या खेळी खेळल्या, तर आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान हा संघ अतिशय धोकादायक ठरेल.” भारताने पाकिस्तानविरुद्धचे शेवटचे तीनही एकदिवसीय सामने जिंकले आहेत. आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाची खोली प्रबळ दावेदार ठरते, असे अश्विनचे मत आहे.
अश्विन पुढे म्हणाला, “पाकिस्तानकडे अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहेत. टेप बॉल क्रिकेटमुळे त्यांच्याकडे नेहमीच उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असतात. नव्वद आणि २००० च्या दशकातही त्यांची फलंदाजी चांगली राहिली आहे. मात्र गेल्या ५-६ वर्षांत विविध टी-२० लीगमध्ये खेळून त्यांच्या फलंदाजीत पुन्हा सुधारणा झाली आहे. पाकिस्तान सुपर लीगशिवाय ते बिग बॅश लीगमध्येही खेळत आहेत.”
रविचंद्रन अश्विन म्हणाला की, संघाने ‘स्ट्रॅटेजिक अॅडव्हान्ट’ म्हणून क्रीजमधून बाहेर पडणाऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विचार गोलंदाजांनी केला पाहिजे. तो म्हणाला, “त्यांपैकी काही, नैतिकदृष्ट्या उच्च असल्याने, या प्रकरणात म्हणतील, ‘आम्हाला अशा प्रकारचे क्रिकेट खेळायचे नाही.’ परंतु स्मार्ट संघ त्यांच्या फायद्यासाठी अशा विधानांचा वापर करतील. हा एक धोरणात्मक फायदा आहे.”
अश्विन म्हणाला, “मी आयपीएलमध्ये असे करून पाच वर्षे झाली आहेत. आजही काही म्हणत आहेत की हे कोणी करू नये. त्यांना हे का करायचे नाही, हे मला चांगले समजते. पण तुम्ही अजूनही त्याच विचारधारेवर अडकलेले आहात याचे मला आश्चर्य वाटते.” याबाबत मी नुकतेच ट्विट केले होते. आतापर्यंत मी आणि दीप्ती शर्माने भारतासाठी हे केले आहे. त्यामुळेच त्या भागातील लोक ते स्वीकारत आहेत. इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध असे करताना पाहिले आहे का?
हेही वाचा – PAK vs NEP: बाबर आझमची कॅप्टन इनिंग! Asia Cup 2023चे झळकावले पहिले शतक, सईद अनवरचा रेकॉर्ड धोक्यात
दोष फलंदाजाचा असतो आणि फलंदाज कोणाचा आहे? असा प्रश्न असू नये –
फिरकीपटू म्हणाला की, “एका भारतीय पत्रकाराने यावर ट्विट केले होते आणि त्यांनी जे सांगितले ते बरोबर आहे. विराट कोहली किंवा रोहित शर्मा विश्वचषकाच्या सामन्यात निर्णायक टप्प्यावर असे आऊट झाले, तरी आम्ही ते स्वीकारणार का? यावर आश्विन उत्तर देताना म्हणाला, “जेव्हा हे होईल, तेव्हाच कळेल की आम्ही ते स्वीकारले आहे की नाही. पण आपल्या बाबतीत घडले तरी, ते आपण स्वीकारले पाहिजे. कारण दोष फलंदाजाचा आहे आणि फलंदाज कोणाचा आहे? असा प्रश्न असू नये.”