Ravichandran Ashwin Statement on Retirement: भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घेणार हे सांगितले आहे. याशिवाय त्याने अनिल कुंबळेच्या भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. ३७ वर्षीय अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१६ विकेट घेतल्या आहेत. कुंबळेच्या नावावर ६१९ विकेट्स आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रविचंद्रन अश्विनने क्रीडा पत्रकार विमल कुमार यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याने निवृत्ती आणि अनिल कुंबळेच्या रेकॉर्डबाबत वक्तव्य केले. निवृत्तीबाबत अश्विन म्हणाला की, सध्या त्याच्या मनात असं काहीही नाहीय. ज्या दिवशी त्याला वाटेल की तो त्याच्या खेळीत अधिक सुधारणा करू शकत नाही, तेव्हा तो खेळाला अलविदा म्हणेल. याशिवाय अनिल कुंबळेचा विक्रम मोडण्याचा विचारही करत नसल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा – Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकाने मैदान गाजवलं, ९ विकेट्स घेत अर्जुनने संघाला मिळवून दिला विजय, पाहा VIDEO

निवृत्तीबद्दल अश्विन म्हणाला, “माझ्या मनात असं काही नाही. मी आजच्या दिवसाचा विचार करतो. आता मी एकेक दिवस यापद्धतीने विचार करतो. जसं वय वाढतं तसं फिट राहण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागते. गेली ३-४ वर्षांपासून मी खूप सातत्याने फिट राहून चांगलं खेळण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी अजून काही ठरवलं नाही. ज्यादिवशी मला वाटेल मी खेळात आणखी सुधारणा करू शकत नाही त्यादिवशी मी थांबेन. ”

हेही वाचा – Asian Champions Trophy: अपराजित भारतीय हॉकी संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, द. कोरियाचा ४-१ ने पराभव, फायनलमध्ये ‘या’ तगड्या संघाचं आव्हान

अनिल कुंबळेंच्या रेकॉर्डबाबत काय म्हणाला अश्विन?

अनिल कुंबळेच्या विक्रमाच्या प्रश्नावर अश्विन म्हणाला, “असं काही लक्ष्य ठरवलेलं नाही. मी अनिल कुंबळेंचा रेकॉर्ड मोडित काढावा, अशी त्यांची इच्छा आहे. मी अनिल कुंबळेंबरोबरही खेळलो आहे, पण मी कोणतेही टार्गेट सेट करत नाही आणि मी कोणतेही टार्गेट सेट केलं सुध्दा नाही पाहिजे. मी खूप आनंदी आहे आणि क्रिकेटचा आनंद घेत आहे.

हेही वाचा – Asian Champions Trophy: अपराजित भारतीय हॉकी संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, द. कोरियाचा ४-१ ने पराभव, फायनलमध्ये ‘या’ तगड्या संघाचं आव्हान

अश्विन पुढे म्हणाला, २०१८ ते २०२२ या काळात मी काय अनुभवलंय ते मला माहित आहे. त्यानंतर माझे आयुष्य कसे बदलले आणि मी क्रिकेट कसा खेळतो हे मला माहित आहे आणि मी हीच गोष्ट कायम सातत्याने सुरू ठेवायची आहे. मी कोणत्याही गोष्टीसाठी खेळावरील माझे प्रेम गमावू इच्छित नाही. मग ते लक्ष्य असो किंवा इतर काही. ज्या क्षणी मला असे वाटेल की मी पुरेसा प्रयत्न करून जीवनाचा आनंद घेत नाही, तेव्हा मी सगळं सोडून देईन. आम्ही सर्व सध्याच्या घडीला खेळत आहोत आणि एक दिवस प्रत्येकाला हे सोडून पुढे जायचे आहे. दुसरे कोणीतरी येऊन भारतीय क्रिकेटसाठी चांगली कामगिरी करेल. हे नक्की आहे.” रवीचंद्रन अश्विन बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. या कसोटीत खेळताना अश्विनला काही विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे.

Story img Loader