Ravichandran Ashwin takes greatest catch video viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना मुंबईत खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया चांगल्या स्थितीत आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर गुंडाळला. अशा प्रकारे किवी संघाकडून भारताला केवळ १४७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. टीम इंडिया तिसऱ्या दिवशी हा सामना जिंकेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान या सामन्यात रविचंद्रन अश्विनने घेतलेल्या उत्कृष्ट झेलची सर्वत्र चर्चा आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
खेळाच्या दुसऱ्या दिवशीही फिरकी गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये होते. जिथे आर अश्विनने तीन विकेट्स घेतल्या. या सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनला एकही विकेट मिळवता आली नव्हती. त्यामुळेच प्रत्येक विकेटनंतर तो अतिशय आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होता. या दरम्यान त्याने एक अप्रतिम झेलही घेतला. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अश्विनचा झेल अप्रतिम दिसत आहे. चाहतेही अश्विनचे खूप कौतुक करत आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या ४४ धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनच्या उत्कृष्ट झेलचा व्हिडीओ व्हायरल –
यानंतर विल यंग आणि डॅरिल मिशेल यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी साकारली. त्यानंतर डॅरिल मिशेलने रवींद्र जडेजाच्या षटतकातील एका चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू दूर न जाता मैदानातच खूप उंच हवेत गेला. यानंतर अश्विनने चेंडूचा पाठलाग करत पाठीमागे धावताना जाऊन अप्रतिम झेल टिपला. ज्यामुळे न्यूझीलंड संघाला ९४ धावांवर चौथा धक्का बसला. झेल घेतल्यानंतरही अश्विनने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे झाले, तर डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने पाच विकेट्स घेतल्यामुळे न्यूझीलंडने तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात भारताला २६३ धावांत रोखण्यात यश मिळविले. भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९० धावा केल्या तर ऋषभ पंतने ६० धावांची तुफानी खेळी केली. भारताने सकाळची सुरुवात चार गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावांवर केली आणि या दोघांच्या प्रयत्नांमुळे त्यांनी पहिल्या डावात २८ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंड संघाने आपल्या दुसऱ्या डावात १७१ धावांवर ९ विकेट्स गमावल्या होत्या, त्यानंतर त्याच्याकडे एकूण १४३ धावांची आघाडी होती.