भारतीय कसोटी संघाचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विन यंदाच्या हंगामात काऊंटी क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. नॉटिंगहॅमशायर संघाने यंदाच्या हंगामात सहा सामन्यांसाठी आश्विनला करारबद्ध केलं आहे. नॉटिंगहॅमशायर संघाने प्रसिद्धीपत्रक काढून आणि आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली आहे. जेम्स पॅटिन्सन या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या जागी आश्विनची संघात निवड करण्यात आली आहे.

३० जूनरोजी एसेक्स संघाविरुद्ध आश्विन आपला पहिला सामना खेळणार आहे. यानंतर सोमरसेट आणि सरे या संघांविरुद्ध सामन्यातही आश्विन खेळणार आहे. मात्र १८ ऑगस्टला यॉर्कशायर संघाविरुद्धचा सामना आश्विन खेळू शकणार नाहीये. यादरम्यान भारतीय संघ विंडीजविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे, त्यामुळे आश्विन या मालिकेसाठी भारतीय संघात परतेल.

या संधीबद्दल रविचंद्रन आश्विनने नॉटिंगहॅमशायर संघ प्रशासनाचे आभार मानले. आपल्या संघाला जास्तीत जास्त सामने जिंकवून देण्याचा माझा प्रयत्न असेल, असं आश्विनने म्हटलं आहे. मात्र कसोटी मालिका आटोपल्यानंतर आश्विन पुन्हा एकदा नॉटिंगहॅमशायर संघाकडून अखेरचे ३ सामने खेळू शकणार आहे.

Story img Loader