R Ashwin 100th Test: रवीचंद्रन अश्विनच्या १०० व्या कसोटीनिमित्त त्याची पत्नी प्रिती नारायण हिने त्याच्या या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला आहे. माझा पती रवीचंद्रन अश्विन हा त्याच्या १०० व्या कसोटीच्या उंबरठ्यावर आहे आणि आमचे लग्न ९८ कसोटी जुने आहे.धरमशाला कसोटीसाठी निघण्यापूर्वी आम्ही बोलत होतो त्यावेळेस मला अश्विनच्या काही विकेट्स आठवत होत्या.गेल्या पाच वर्षांपर्यंत मी त्याचे प्रत्येक विकेट लक्षात ठेवायचे पण नंतर सामन्यांची संख्या इतकी वाढली की ते अवघड होऊ लागलं. हे ९९ कसोटी सामने कसे निघून गेले आम्हाला कळलंच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका व्यावसायिक क्रिकेटपटूचं जीवन जसं भासतं तसं प्रत्यक्षात नक्कीच नसतं. आमच्या लग्नापूर्वी डेटिंग अ‍ॅप वगैरे नसल्याने लग्नानंतरचं जीवन कसं असेल याची मला त्याने काहीच कल्पना दिली नव्हती.आमचं लग्न झाल्यानंतर लगेच आम्ही कोलकाताला वेस्ट इंडिजविरूध्द कसोटी खेळण्यासाठी रवाना झालो.मला माहित नव्हतं की तिथे मिडियाच्या इतका नजरा आमच्यावर असतील. मला आमच्या लग्नातील एक किस्सा आठवतोय की लग्नात जेव्हा तो माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होता, त्यावेळेस आमच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणावर फोटोग्राफर होते पण त्यामध्ये आमच्या लग्नासाठी आम्ही ज्याला लग्नाचे फोटो घेण्यासाठी ऑर्डर दिली होती, तो फोटोग्राफर दूर दूरपर्यंत कुठेच दिसत नव्हता. त्याचवेळेस सेलिब्रेटी क्रिकेटपटूच्या आसपास असणं म्हणजे काय याचा पहिला अनुभव मला लग्नातच आला.

पण यासोबत सर्वांच्या नजरा आपल्यावर असणं मला नको होतं. मला माझी स्वत:ची ओळख होती आणि मला या अशा जाळ्यात अडकायचं नव्हतं, जिथे माझ्या आजूबाजूला काय घडेल यावर माझे नियंत्रण नसेल.आधी तर मला काही कळेनाच, सुरूवात होती ती किट बॅग भरण्यापासूनच. नेट सेशन काय हे मला माहित होते पण ट्रेनिंग म्हणजे अतिरिक्त जिम सेशन असतं याची कल्पना नव्हती.

जेव्हा तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचा आणि सामन्यांसाठी एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असे तेव्हा मला कधीच एका जागी स्थिरावलो आहोत किंवा स्थिरता अशी मिळालीच नव्हती.ही गोष्ट अजिबातच ग्लॅमरस नव्हती. आम्ही चांगल्याच हॉटेलमध्ये असायचो यात काही शंकाच नाही. त्या हॉटेलच्या खोलीत आपल्या व्यक्तीसोबत घालवायला मिळणारा वेळ खूपच मर्यादित असायचा आणि घरच्या मैदानावर सामना असेल तर तुम्ही बाहेर पडण्याचा विचार करू शकत नाही.विचित्र वेळापत्रक आणि वचनबद्धता यांची मोठी भूमिका असायची.

सुरुवातीची काही वर्षे मी खूप अस्वस्थ होते ,लग्नाबाबतीत नाही पण क्रिकेटच मला त्याच्यापासून दूर ठेवत होतं.मला माहित आहे की मी त्याच्यावर प्रेम करते पण तो जे करत आहे ते मला आवडत नसेल तर मी आज जे करत आहे ते केले असते का? त्याला प्राधान्य देण्यात मला काहीच अडचण नव्हती.पण सुरुवातीची काही वर्षे मी खूप अस्वस्थ होते. आधी सरप्राईज, मग धक्का आणि मग नकार. जेव्हा आम्हाला मुलं झाली तेव्हा मी आमच्या दोघांना पूर्वी जितका वेळ मिळायचा तोही मिळत नसे. मला हे समजायला वेळ लागली की तुम्हाला मोठं यश मिळवायचं असेल तर त्यासाठी जबर किंमत द्यावी लागते ती म्हणजे त्याच्या आईवडील, बायको, मुलांना त्याला पुरेसा वेळ देता येत नाही.

अश्विन सात वर्षांचा असल्यापासून या खेळाने जणू त्याच्या जीवनाचा त्याच्या वेळेचा ताबा घेतला आणि मला हे उमगण्यास वेळ लागला की कधीकधी क्रिकेटपटूंना क्रिकेटशिवाय इतर काहीच दिसत नाही. तुमच्या जीवनात दुसरे नाते जोडण्यासाठी आणि जपण्यासाठी संधीच मिळत नाही.

पण कोविडने खऱ्या अर्थाने आम्हाला एकत्र आणले. एका वाईट रूपात असलेला कोविड आमच्यासाठी जणू आशीर्वाद ठरला कारण आम्हा सर्वांना उमगलं की अश्विन कदाचित पुन्हा कधी क्रिकेटच खेळणार नाही. लग्नाला तेव्हा आठ-नऊ वर्षे झाली असतील जेव्हा आम्ही एका सामान्य जोडप्याप्रमाणे एका छताखाली एकत्र राहत होतो.

कोविडच्या काळातच अश्विनच्या लक्षात आले की कुटुंब देखील त्याच्या जीवनाचा एक भाग असू शकतं. या काळात तो आम्हाला जास्त वेळ देऊ लागला. त्याच्यामुळे त्याला भरपूर आनंद मिळू लागला. मैदानावर जे दडपणाचं आयुष्य असतं त्याला सामोरं जाण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी त्याला बळ मिळू लागलं. त्यामुळेच गेल्या काही वर्षात तो खेळाशी अतीव निष्ठेने जोडला गेला आहे पण त्याचवेळी तो अलिप्तही आहे.

२०१७ हे वर्ष त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारं होतं.२०१७ मार्चमध्ये त्याने मला सांगितले की, ‘मी लेग-स्पिनवर काम करत आहे, याचा जर अपेक्षित असा परिणाम नाही दिसून आला तर मी क्रिकेट सोडेन.’ त्याने जे सांगितले त्याचा मी फारसा विचार केला नाही कारण काहीच दिवसांपूर्वी त्याला ICC प्लेयर ऑफ द इयर आणि ICC बॉलर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले होते. २०१६-१७ मध्ये भारतात झालेल्या कसोटीत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती.पण नंतर त्या वर्षी तो भारताच्या वनडे आणि ट्वेन्टी२० संघाचा भाग नव्हता

तो एक असा माणूस आहे, ज्याला प्रत्येक गोष्टी स्पष्ट हव्या असतात आणि या काळात त्याला संघातून वगळण्यात आलं की त्याला विश्रांती देण्यात आली आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्याच्यासाठी ते फारच अवघड होते. अश्विनला कुणी जर म्हणालं ‘ऐक हे तू नीट करत नाहीस’ तर तो त्यावर काम करून त्यात सुधारणा करत असे. पण तो संघात का नाही याचे कारण त्याला सांगण्यात आलं नाही, तेव्हा मात्र मी त्याला धडपडताना पाहिले आणि त्यावेळी आम्हाला दोन लहान मुलं होती. त्यामुळे आमच्यापैकी कोणाशीही उघडपणे बोलणं, मन मोकळं करणं त्याच्यासाठी कठीण होते.

कदाचित ही एकमेव वेळ असेल जेव्हा त्याने याबाबत आपले मन कोणासमोरही मोकळे केले नाही आणि त्याने काऊन्सेलिंगची मदत घेतली. तो फार कठीण काळ होता आणि आमच्यापैकी कोणीही त्याला मदत करू शकत नव्हतो. आपण संघात नाही हे पचवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्याला एका वर्षाचा काळ लागला.पण त्यानंतर मात्र तो एक वेगळा व्यक्ती म्हणून समोर आला होता. त्याने एकदाही पुनरागमनाचा विचार केला नाही त्यापेक्षा त्याने नेहमी त्याच्या खेळात अव्वल असण्याचा विचार केला.

तो मैदानावर जसा असतो तसा तो नक्कीच मैदानाबाहेर नाहीय. तो घरात नसण्याची आम्हाला इतकी सवय आहे की तो घरात आल्यावर आपल्या या विश्वात कोणीतरी आल्यासारखं वाटतं आणि त्याच्यासाठीही तसंच काहीसं आहे. मी त्याला नेहमी सांगते की तो निवृत्त झाल्यानंतर, तो कसा असेल, काय करेल हे आपल्याला आताच ठरवावे लागेल. दोन मुलांचा बाबा म्हणून तो अत्यंत कर्तव्यदक्ष आहे.तो मुलांची शाळेत जायची तयारी करतो. त्यांना शाळेत सोडतो, आणतोही. त्याने त्या दोघींना फलंदाजी शिकवली आहे. कदाचित आयपीएलनंतर तो त्यांना गोलंदाजी कशी करायची हेही शिकवेल.

अश्विनच्या १००व्या कसोटीचा जितका जल्लोष आणि उत्साह सध्या घरात आहे तितका तो ५०० व्या विकेटच्या उंबरठ्यावर असताना नव्हता. कारण अश्विनने त्याच्या या ५००व्या कसोटी विकेटबद्दल आम्हाला काहीच सांगितले नव्हते. राजकोटमध्ये कसोटी सुरू होती आणि मुले नुकतीच शाळेतून परतली होती तेव्हा पाच मिनिटांनंतर त्याने ५००वी कसोटी विकेट मिळवली आणि आम्हाला एकच सर्वांचे अभिनंदन करणारे कॉल येऊ लागले.

तेव्हाच आई जमिनीवर कोसळल्याचा मला अचानक आवाज आला आणि काही वेळातच आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी, आम्ही अश्विनला न सांगण्याचा निर्णय घेतला होता कारण चेन्नई आणि राजकोट दरम्यान फ्लाइट कनेक्टिव्हिटी चांगली नव्हती.

त्यामुळे तेव्हा मी चेतेश्वर पुजाराला कॉल केला आणि त्याच्या कुटुंबाकडून आम्हाला लगेचच मदत मिळाली. या सगळ्यातून थोडा स्थिरावल्यानंतर मी
अश्विनला कॉल केला कारण स्कॅन केल्यानंतर, डॉक्टरांनी सुचवले की त्यांचा मुलगा जवळ असणे चांगले आहे. त्याला धक्का बसला होता. त्याचा आवाज ऐकवेना. त्यानेही फोन ठेऊन दिला. मी त्याला जे सांगितलं ते पचवून, स्वीकारायला त्याला अर्धा तास लागला.पण खरंच रोहित शर्मा, राहुल भाई (द्रविड) आणि संघातील इतरांचे आणि बीसीसीआयचे आभार – अश्विन राजकोटहून चेन्नईला पोहोचेपर्यंत ते आमच्या संपर्कात होते. तो रात्री उशिरा येथे पोहोचला.

आईला आयसीयूमध्ये पाहणे हा त्याच्यासाठी खूप भावनिक क्षण होता. त्यांची प्रकृती स्थिरावल्यानंतर आम्ही त्याला संघात पुन्हा सामील होण्यास सांगितले. त्याचे व्यक्तिमत्व पाहता तो असा सामना अर्ध्यात कधीच सोडणार नाही आणि जर त्याने त्याच्या संघासाठी सामना जिंकला नाही तर त्यालाच खूप जास्त अपराधी वाटेल. त्या दोन दिवसांत, मला जाणवले की त्याच्या पालकांसोबत वेळ घालवण्याची त्याची तळमळ आता खूप वाढली आहे आणि ती वय आणि परिपक्वतेसह येत आहे.

आपण निवृत्तीनंतरच्या जीवनाबद्दल वेळोवेळी बोलत असतो. मला वाटतं निवृत्तीनंतर काय हा एक खूप महत्त्वाचा विषय असतो, कारण तुम्हाला आवडो किंवा न आवडो, क्रिकेटनंतर आयुष्याला एक वेगळे वळण मिळते.आम्ही ४-५ वर्षांपासून याबद्दल चर्चा करू लागलो की त्याला असा छंद जोपासणे आवश्यक आहे ज्याचा खेळाशी काहीही संबंध नाही, कारण खेळाव्यतिरिक्त इतरही काहीतरी आवड असण गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही असंच काहीस त्याच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत पण त्याला अजूनही आवडेल असे काही सापडले नाही.

तो एक महत्त्वाच्या कामगिरीच्या उंबरठ्यावर उभा असताना त्याच्या अतुलनीय कामाची पध्दत आणि त्याचे खेळाप्रतिचे वेडेपण दिसून येते. मला शंभर टक्के खात्री आहे की त्याला हे त्याच्या आई-वडिलांकडून मिळाले आहे आणि तो जे काही त्याच्या जीवनात करतो त्यात त्याचे प्रतिबिंब दिसून येते. मग त्याचे YouTube चॅनल असो किंवा ऑनलाइन बुद्धिबळ खेळणे असो.धरमशाला कसोटीसाठी जात असताना मी हे लिहिलं आणि हे लिहिताना मला जाणवलं की ही किती आनंददायक गोष्ट आहे.अश्विन तुझं ​​अभिनंदन.आम्ही एकत्र ९९ कसोटी सामने खेळलो आहोत.तू खेळलेल्या आणि न खेळलेल्या सर्व कसोटी सामन्यांचा आम्हाला अभिमान आहे.हा एक सुंदर प्रवास आहे आणि मला आशा आहे की यापुढील प्रवासही तुला तितकाच आनंद देणारा असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin wife prithi narayan talks about journey to 100th test bdg99
Show comments