Ranji Trophy 2025 Saurashtra beat Delhi by 10 wickets : टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्याने रणजी ट्रॉफीचा सध्याचा हंगाम चर्चेत आहे. रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या सामन्यात, अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या सौराष्ट्र संघाने ऋषभ पंतच्या दिल्ली संघाचा केवळ ३.१ षटकांत म्हणजे १९ चेंडूत १० गडी राखून पराभव केला. या विजयाचा शिल्पकार रवींद्र जडेजा ठरला, ज्याने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या आणि दुसऱ्या ७ विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे त्याने १२ विकेट्स घेत दिल्लीचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ४९.४ षटकांत सर्व गडी गमावून १८८ धावा केल्या. कर्णधार आयुष बडोनीने संघाकडून सर्वाधिक ६० धावांची खेळी खेळली, तर यष्टीरक्षक ऋषभ पंत बऱ्याच वर्षांनी रणजी सामना खेळताना छाप सोडण्यात अपयशी ठरला. तो धर्मेंद्र सिंग जडेजाच्या चेंडूवर एक धाव काढून बाद झाला. रवींद्र जडेजाने या डावात ६६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
रवींद्र जडेजाने दोन्ही डावात घेतल्या १२ विकेट्स –
त्यानंतर सौराष्ट्रने पहिल्या डावात ७२.२ षटकांत २७१ धावा केल्या. त्यासाठी सलामीवीर हार्विक देसाईने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली, तर रवींद्र जडेजाने ३८ आणि एव्ही वासवडा याने ६२ धावा केल्या. दिल्लीकडून हर्ष त्यागीने ४ विकेट्स घेतले, तर आयुष बडोनीने येथेही जबरदस्त कामगिरी करत ३ विकेट्स घेतल्या.
सलद दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाची शानदार गोलंदाजी –
दुसऱ्या डावात दिल्लीला आपल्या फलंदजांकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. यावेळी अवघ्या ९४ धावांत संपूर्ण संघ गडगडला. पुन्हा एकदा आयुष बडोनीने संघासाठी ४४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली आणि संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या टोकाला त्याला साथ मिळाली नाही. यावेळी रवींद्र जडेजाने सुरुवातीपासूनच घातक गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.
ऋषभ पंत दोन्ही डावात अपयशी –
१७ धावा करून बाद झालेल्या ऋषभ पंतचीही जडेजाने शिकार केली. ऋषभ पंत आणि आयुष बडोनी व्यतिरिक्त, अर्पित राणा १२ धावांच्या रूपात संघासाठी दुहेरी आकडा गाठणारा तिसरा फलंदाज होता. या डावात रवींद्र जडेजाने ३८ धावांत ७ विकेट्स घेतल्या, तर २ विकेट धर्मेंद्र सिंग जडेजाच्या नावावर राहिल्या. एक विकेट युवराज सिंग डोडियाच्या नावावर राहिली.