Ravindra Jadeja and KL Rahul ruled out of third Test : इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सामन्याच्या एका दिवसानंतर संघाला सलग अनेक धक्के बसले. प्रथम जसप्रीत बुमराहला आयसीसीने फटकारले आणि शिक्षा सुनावली. त्यानंतर टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुलही दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले. विशेष म्हणजे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहली आधीच संघाबाहेर आहे. म्हणजेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
टीम इंडियात कोणाला मिळाली एन्ट्री?
रवींद्र जडेजा आणि केएल राहुलला भारतीय संघातून वगळण्यात आल्याने एका युवा खेळाडूचे नशीब चमकले आहे, ज्याचा संघात समावेश करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ते नाव म्हणजे सरफराज खान ज्याने भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. केएल राहुलच्या जागी सरफराज खानला संघात संधी मिळाली. त्याचबरोबर रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय आवेश खानही रणजी संघात राहणार असून त्याच्या जागी सौरभ कुमारची निवड करण्यात आली आहे.
जडेजा आणि राहुल का बाहेर झाले?
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलच्या मांडीत दुखत असल्याने त्याने माघार घेतली आहे. त्यामुळे तो २ फेब्रुवारीपासून होणाऱ्या विशाखापट्टणम कसोटीतून बाहेर राहणार आहे. याशिवाय रविवारी हैदराबाद कसोटीत रवींद्र जडेजा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा बळी ठरला होता. दुसऱ्या डावात धावा घेताना जडेजा जखमी झाला आणि त्यामुळे तो धावबादही झाला. आता हे दोन्ही खेळाडू तिसऱ्या कसोटीपर्यंत परततात की नाही याविषयी आगामी अपडेटची प्रतीक्षा केली जाईल.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, सौरभ कुमार.