भारताचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि त्याचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा यांच्यात सध्या वाद सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिरुद्धसिंह जडेजा यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, त्यांच्या कुटुंबात तेढ निर्माण झाली आहे. त्यांची सून रिवाबा या भांडणास कारणीभूत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. वडिलांच्या या वक्तव्यानंतर रवींद्र जडेजा पत्नीच्या बचावासाठी पुढे आला आहे. जडेजा त्याच्या वडिलांना म्हणाला, “माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं थांबवा”. अनिरुद्धसिंह जडेजा एका मुलाखतीत म्हणाले होते की, लग्नानंतर माझा मुलगा बदलला आहे. मी आणि माझा मुलगा (रवींद्र) एकमेकांच्या संपर्कात नाही. आम्ही एकाच शहरात राहतो, तरीदेखील आमच्यात कुठल्याही प्रकारचं संभाषण होत नाही.
रवींद्र जडेजाने म्हटलं आहे की, त्याच्या वडिलांची मुलाखत स्क्रिप्टेड होती. तसेच त्याने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर गुजराती भाषेत एक पोस्ट केली आहे. जडेजाने यामध्ये लिहिलं आहे की, मला खूप काही बोलायचं आहे, परंतु, मी सार्वजनिकरित्या काहीच बोलणार नाही. स्क्रिप्टेड मुलाखतीत जी काही वक्तव्ये केली गेली आहेत त्याकडे दुर्लक्ष करा. अनिरुद्धसिंह जडेजा यांनी दिव्य भास्करला दिलेल्या मुलाखतीत सुनेवर आरोप केले होते. त्यावर रवींद्र जडेजाने संताप व्यक्त केला आहे.
रवींद्र जडेजाने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं (गुजराती) आहे, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करू नका. दिव्य भास्करला दिलेल्या अविश्वसनीय मुलाखतीत केलेली वक्तव्ये निरर्थक आणि साफ खोटी आहेत. ती सगळी एकतर्फी वक्तव्ये आहेत. मी त्या वक्तव्यांचं खंडण करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सगळा प्रकार अयोग्य आणि निंदनीय आहे. मी याबद्दल खूप काही बोलू शकतो. परंतु, मला सार्वजनिकरित्या काहीही बोलायचं नाही. मी सार्वजनिकपणे न बोलणं जास्य उचित ठरेल.
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा गुजरात विधानसभेच्या आमदार आहेत. २०२२ च्या विधासभा निवडणुकीत रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून ८४,३३६ मताधिक्यासह जिंकल्या होत्या. तर जडेजा मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीवेळी भारताच्या प्लेईंग इलेव्हन संघात नव्हता. तो आता दुखापतीतून सावरत असून पुढच्या कसोटी सामन्यात तो भारतीय संघाकडून खेळू शकतो.