Ravindra Jadeja becomes Second Indian left hand spin bowler to get 5 wicket haul: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या ३७ व्या सामन्यात, रवींद्र जडेजाने अगोदर फलंदाजीत नाबाद २९ धावांचे योगदान दिले. यानंतर गोलंदाजीत शानदार गोलंदाजी केली. त्याने ३२६ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवून इतिहास रचला. जडेजाने ९ षटकात ३३ धावा देऊन 5 विकेट घेतल्या आणि विश्वचषकाच्या इतिहासात ५ विकेट्स घेणारा दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला.
याआधी युवराज सिंगने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत ही कामगिरी केली होती. गमतीची गोष्ट म्हणजे गेल्या वेळी जेव्हा डावखुरा फिरकीपटू युवराजने विश्वचषकात भारतासाठी ५ विकेट घेतल्या होत्या, तेव्हा तो संघ चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला होता. विश्वचषकात एका डावात ५ बळी घेणारा जडेजा हा केवळ ७वा भारतीय गोलंदाज आहे. याआधी कपिल देव, रॉबिन सिंग, व्यंकटेश प्रसाद, आशिष नेहरा, युवराज सिंग आणि मोहम्मद शमी यांनी ही कामगिरी केली आहे.
एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी ५ विकेट्स घेणारे फिरकीपटू –
२०११ – युवराज सिंग – ५/३१ विरुद्ध आयर्लंड
२०२३ – रवींद्र जडेजा* – ५/३३ विरुद्ध दक्षिण आफ्रिका
एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी ५ विकेट्स घेणारे गोलंदाज –
१९८३: कपिल देव
१९९९: रॉबिन सिंग
१९९९: व्यंकटेश प्रसाद
२००३: आशिष नेहरा
२०११: युवराज सिंग
२०१९: मोहम्मद शमी
२०२३: मोहम्मद शमी
२०२३: मोहम्मद शमी
२०२३: रवींद्र जडेजा
हेही वाचा – IND vs SA: “मला आशा आहे की…”, विराट कोहलीच्या ४९व्या वनडे शतकावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
विराट कोहलीचे शतक आणि जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव करत विश्वचषकात सलग आठवा एकतर्फी विजय नोंदवला. अव्वल दोन संघांमधील सामन्यात कोहली (नाबाद १०१) आणि श्रेयस अय्यर (७७) यांच्यातील १३४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव २७.१ षटकांत ८३ धावांवर आटोपला. या विजयानंतर, भारत आठ सामन्यांतून १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. आता भारताला १२ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. दक्षिण आफ्रिका तितक्याच सामन्यात १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भिडतील अशी अपेक्षा आहे.