आपण क्रिकेटसह अनेक खेळांच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचं शानदार कमबॅक पाहिलं आहे. कधी फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूने फॉर्ममध्ये येऊन केलेलं कमबॅक तर कधी दुखापतीतून सावरत केलेलं कमबॅक आपण पाहिलं आहे. हॉकीपटू संदीप सिंह, टेनिसपटू आंद्रे अगासी, क्रिकेटपटू युवराज सिंह यांनी केलेलं कमबॅक संपूर्ण जगाने पाहिलं आणि या खेळाडूंना सर्वांना सलाम ठोकला. असंच कमबॅक आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळालं. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने दुखापतीतून सावरत संघात जोरदार पुनरागमन केलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात बॉर्डर गावस्कर चषक ही कसोटी क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. यंदा या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. या मालिकेतला पहिला सामना आजपासून नागपूर येथे खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस भारताने आपल्या नावावर केला. आजच्या दिवसाचा हिरो ठऱला तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा.
नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांना सपशेल चुकीचा ठरवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने प्रत्येक एक बळी घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद ६ धावा अशी करून ठेवली.
खेळपट्टी फिरकीला साथ देईल असं चित्र दिसू लागल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने चेंडू रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाकडे सोपवला. या दोघांनी ३७.५ षटकांमध्ये उर्वरित ८ गडी बाद केले. अश्विनने १५.५ षटकांत ४२ धावा देत ३ बळी घेतले तर रवींद्र जडेजाने २२ षटकात ४७ धावा देत ५ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांमध्ये आटोपला.
कमबॅक असावं तर जडेजासारखं!
जडेजाने आज भारतीय संघात स्वप्नवत असं पुनरागमन केलं. जडेजाने केलेल्या पुनरागमनाची प्रत्येक खेळाडूला आशा असते. काही महिन्यांपूर्वी कुबड्यांच्या आधारावर चालणाऱ्या खेळाडूसाठी मुळात संघात परत जागा मिळवण शक्य नसतं. परंतु जडेजाने ते करून दाखवलं आहे. जडेजाच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली होती. पण, जडेजाने केवळ त्याच्या अडचणींवर, दुखापतीवरच मात केली नाही तर तो पूर्वीपेक्षा जबरदस्त खेळाडू म्हणून परतला आहे. त्याच्या पुनरागमनामुळे भारताने या सामन्यावर आपली पकड निर्माण केली आहे. दिवसअखेर कर्णधार रोहित शर्माने झटपट अर्धशतक (६९ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५६ धावा) झळकावत भारताला १ बाद ७७ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे.
हे ही वाचा >> IND vs AUS 1st Test: विराट कोहलीने स्मिथचा झेल सोडताच नोंदवला लाजिरवाणा विक्रम; ‘या’ क्लबमध्ये झाला सामील
जडेजाचे पाच बळी
रवींद्र जडेजाने आज २२ षटकं गोलंदाजी केली. यात ८ निर्धाव षटकांसह त्याने ४७ धावा देत ५ बळी टिपले. मार्नस लॅबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेन्शॉ, पीटर हँड्स्काँब आणि टॉड मर्फी या फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला.