भारताची माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळाबरोबरच त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो. त्याच्या याच स्वभावामुळे अनेकजण त्याचे चाहते आहेत. धोनी मितभाषी आहे, मात्र त्याचं मोजकं आणि महत्त्वाचं व्यक्त होणं अनेकदा चर्चेचा विषय ठरतं. आता त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तब्बल दोन वर्षांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे. यावर भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजाने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
रविंद्र जडेजाने महेंद्रसिंग धोनीच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत धोनी चालवत असलेल्या ट्रॅक्टरला नंबर प्लेटच नसल्याचं लक्षात आणून दिलं. जडेजा म्हणाले, “ट्रॅक्टरला नंबर प्लेटच नाही.” त्याची ही कमेंट अनेक युजर्सला आवडली आहे. ही कमेंट १८ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केली. तसेच ७०० हून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी तर धोनी आणि जडेजा यांच्या दोस्तीचं कौतुकही केलं.
धोनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हणाला, “काहीतरी नवीन शिकून आनंद वाटला, पण काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागला.”
व्हिडीओत नेमकं काय?
या व्हिडीओत महेंद्रसिंग धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. धोनीने स्वतः ट्रॅक्टर चालवत शेत नांगरणी केली. तसेच रोटा हिटरने नांगरलेल्या शेताची मशागतही केली.
व्हिडीओ पाहा :
धोनी ट्रॅक्टरने शेताची नांगरणी करताना त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती ट्रॅक्टरवर बसलेली दिसत आहे. या व्हिडीओतून धोनीला शेतीचीही आवड असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ आवडीवरच धोनी थांबला नाही. धोनी स्वतः शेती काम शिकण्यासाठी मातीत उतरला आणि त्याने शेती काम शिकण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : हातात पिस्तूल.. पोलिसांचा गणवेश… एमएस धोनीचा नवा लूक व्हायरल! तुम्ही पाहिला का?
दरम्यान, याआधी दोन वर्षांपूर्वी धोनीने शेवटी केलेल्या पोस्टमध्येही त्याने शेतातील एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ धोनीच्या स्ट्रॉबेरीच्या शेतीचा होता. त्यात धोनी आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी तोडून खाताना दिसत आहे.