Ravindra Jadeja Completes 300 Test Wickets: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशला २३३ धावांवर ऑल आऊट केलं आहे. पावसामुळे कानपूर कसोटीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. पहिल्या दिवशी ३५ षटकात ३ बाद १०७ धावा केल्यानंतर बांगलादेशने सर्वबाद होईपर्यंत २३३ धावा केल्या. मोमुनिल हकने शतक झळकावले पण इतर फलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जडेजाने अखेरची विकेट घेत बांगलादेशला ऑल आऊट तर केलंच पण त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रवींद्र जडेजाने खालीद अहमदला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले आणि कसोटी क्रिकेटमधील ३०० वी विकेट मिळवली. या विकेटसह रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेणारा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये, इंग्लंडच्या इयान बोथमने ७२ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता आणि सर्वात कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठणारा जडेजा हा त्याच्यानंतरचा खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना जडेजाचा या फॉरमॅटमधील ७३वा सामना आहे.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचा हवेत झेपावत एकहाती झेल; गिलने धरलं डोकं तर कोच झाले चकित, पाहा VIDEO

जडेजाच्या आधी कपिल देव, आर अश्विन, इयान बॉथम, शेन वॉर्न, इम्रान खान, स्टुअर्ट ब्रॉड, रिचर्ड हॅडली, डॅनियल व्हिटोरी, शॉन पोलॉक आणि चामिंडा वास यांच्यासह जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी ही कामगिरी केली आहे.

रवींद्र जडेजा – सर्वात जलद ३०० विकेट आणि ३००० कसोटी धावा

रवींद्र जडेजाने अजून एक मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. रवींद्र जडेजा सर्वात जलद ३०० विकेट आणि ३००० कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय ठरला. रवींद्र जडेजा हा ३०० कसोटी विकेट घेणारा सातवा भारतीय गोलंदाज आहे. त्याने १७२४८व्या चेंडूवर ३००वी विकेट घेतली. सर्वात कमी चेंडूत ३०० विकेट घेणारा तो रविचंद्रन अश्विन (१५६३६) नंतरचा दुसरा वेगवान गोलंदाज आहे.

हेही वाचा – VIDEO: “टीम इंडियाचा गजनी कोण?”, रोहित शर्माचं खरं उत्तर, तर सूर्यकुमारची प्रतिक्रिया पाहून आवरणार नाही हसू…

रवींद्र जडेजाने आपल्या ७४व्या कसोटीत हा विक्रम केला. रविचंद्रन अश्विन (५४), अनिल कुंबळे (६६) आणि हरभजन सिंग (७२) यांच्यानंतर हा आकडा गाठणारा तो चौथा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज ठरला. त्याने कपिल देव (८३), झहीर खान (८९) आणि इशांत शर्मा (९८) यांना मागे टाकले. रवींद्र जडेजा आणि अश्विन ही जोडी ५४ सामन्यात ५५३ विकेट घेऊन भारताची सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज जोडी बनली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांग्लादेश प्लेइंग इलेव्हन:
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.