Ravindra Jadeja completes 200 ODI wickets: आशिया कप २०२३ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुपर फोर फेरीतील सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शमीम हुसेनला आऊट करत एक खास पराक्रम केला आहे. तो अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथसारख्या दिग्गजांच्या खास यादी सामील झाला आहे.
बांगलादेशला ३५व्या षटकात रवींद्र जडेजाने १६१ धावांवर सहावा धक्का दिला. रवींद्र जडेजाने शमीम हुसेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला एक धाव करता आली. या विकेटसह जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केले आहेत. हा टप्पा गाठणारा तो सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, अजित आगरकर, झहीर खान, हरभजन सिंग आणि कपिल देव यांनी ही कामगिरी केली आहे.
टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये दोनशे किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
अनिल कुंबळे (३३७)
जवागल श्रीनाथ (३१५)
अजित आगरकर (२८८)
झहीर खान (२८२)
हरभजन सिंग (२६९)
कपिल देव (२५३)
रवींद्र जडेजाचा कपिल देवच्या खास क्लबमध्ये प्रवेश –
एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा आणि २०० बळी घेणारा रवींद्र जडेजा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यांच्या आधी हा पराक्रम फक्त कपिल देवच करू शकले होते. शमीम हुसेन जडेजाचा चेंडू पूर्णपणे समजून घेण्यात अपयशी ठरला आणि विकेटसमोर एलबीडब्ल्यू आऊट झाला. शमीमने रिव्ह्यूचाही वापर केला, पण तो निर्णय बदलू शकला नाही.
रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द –
रवींद्र जडेजाने २००९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जडेजाने भारतासाठी आतापर्यंत १८१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने फलंदाजीत २५७८ धावा केल्या आहेत. जड्डूने १३ अर्धशतके केली आहेत. यासोबतच जडेजाने गोलंदाजीत २०० विकेट्स घेतल्या आहेत.