IND vs AUS Ravindra Jadeja Viral Video: भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. भारताने ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या वनडे वर्ल्डकपचा बदला घेत सर्वच भारतीय चाहत्यांना जल्लोषाचा एक क्षण दिला. भारताच्या या सामन्यातील अनेक व्हीडिओ फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यामधील रवींद्र जडेजाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो केएल राहुल आणि रोहित शर्माला ट्रोल करत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, यष्टिरक्षक केएल राहुल आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यात चर्चा सुरू होती, जी स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाली आणि याचा व्हीडिओदेखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये रोहित, राहुल आणि जडेजा हे तिघेही बोलत असल्याचे ऐकू येत आहे. यामध्ये रवींद्र जडेजा गोलंदाजी करत असून त्याच्या षटकात फक्त तीन चेंडू शिल्लक होते आणि राहुल-रोहित त्याच्याशी बोलून विकेट कशी घेता येईल याचं प्लॅनिंग करत होते. रोहित शर्मा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यासाठी यष्टिरक्षक केएल राहुलशी चर्चा करत असतो, तर केएल राहुल त्याला सांगतो की चेंडू जास्त टर्न होत नाहीय.

ही सर्व चर्चा रोहित-राहुल करत असतात, तितक्यात गोलंदाजीसाठी सज्ज असलेला रवींद्र जडेजा त्यांना म्हणतो, ‘तुम्ही दोघं बोला, तोपर्यंत मी माझे तीन चेंडू टाकतो.’ रोहित-राहुलच्या प्लॅनिंगवर पाणी फेरत जडेजा त्यांची चांगलीच फिरकी घेतो. हा मजेदार स्टंप माइक ऑडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जडेजा अगदी एका मिनिटात त्याचं षटकं टाकून पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यात आहे आणि तो अगदी तेच करत असतो, रोहित-राहुलच्या चर्चेमुळे थांबून राहिल्याने जडेजा मजेत त्यांना लगेच असं उत्तर देतो.

उपांत्य फेरीच्या सामन्यात रवींद्र जडेजाने ८ षटकांत ४० धावा देत २ विकेट घेतले. त्याने मार्नस लबुशेन (२९) आणि जोश इंग्लिस (११) यांना माघारी धाडले. भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ (७३) आणि ॲलेक्स कॅरी (६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांनी ४९.३ षटकांत सर्वबाद होत २६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, विराट कोहली (८४), श्रेयस अय्यर (४५) आणि केएल राहुल (४२*) यांनी टीम इंडियासाठी शानदार खेळी खेळली, ज्याच्या जोरावर त्यांनी ४८.१ षटकांत २६५ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

Story img Loader