Ravindra Jadeja is suffering from muscle strain : हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २८धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघ आता १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणे साशंक आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने थेट थ्रो करुन रवींद्र जडेजाला धावबाद करणे हा पहिल्या कसोटीचा ‘टर्निंग पॉईंट’ तर होताच, पण तो मालिकेची दिशाही ठरवू शकतो, कारण सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर एकचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, स्नायूच्या ताणाने त्रस्त आहे. त्यामुले रवींद्र जडेजाचे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणे साशंक आहे.
दुसऱ्या कसोटीत जडेजा खेळणे साशंक –
पहिल्या डावात ८७ धावा करून भारताचा सर्वाधिक धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाने दोन्ही डावात मिळून पाच बळी घेतले. रवींद्र जडेजाच्या स्नायूंना ताण आल्याचे दिसते, कारण तो वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या पायाच्या स्नायूंना हाताने दाबताना दिसत होता. तो आरामदायक वाटत नव्हता आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने याबद्दल फारसे काही सांगितले नाही. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाले, ‘मला अजून फिजिओशी बोलण्याची संधी मिळाली नाही. मी परत जाऊन त्यांच्याशी बोलेन आणि काय झाले ते बघेन.’
हेही वाचा – IND vs ENG Test : ‘भारत अजूनही मालिका जिंकण्याचा प्रबळ दावेदार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान
भारताचा २८ धावांनी दारूण पराभव –
ऑली पोप (१९६ धावा) च्या दमदमर शतकानंतर, नवोदित डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टली (६२ धावांत ७ विकेट) याच्या जादुई स्पेलमुळे इंग्लंडने चौथ्या दिवशी भारतावर २८ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र हार्टलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून यजमान संघ चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ६९.२ षटकांत २०२ धावांवर गारद झाला.
हेही वाचा – IND vs ENG Series : पुनरागमन करण्यासाठी भारताला स्वीप आणि रिव्हर्स स्वीपसारख्या फटक्यांचा उपाय शोधण्याची गरज
अश्विन आणि जडेजा निष्प्रभ दिसले –
२०१३ नंतर घरच्या कसोटीत भारताचा हा चौथा पराभव आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पोपने रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीला, उत्तम प्रकारे हाताळले आणि सहज धावा केल्या. भारताचे दोन्ही अनुभवी फिरकीपटू खेळपट्टीवर कधीही धोकादायक दिसले नाहीत आणि इंग्लंडने दुसऱ्या डावात भरपूर धावा केल्या. तत्पूर्वी, इंग्लंडने शनिवारच्या सहा विकेट्स ३१६ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात करताना पोपच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या डावात ४२० धावा केल्या, ज्यामुळे त्यांना चांगली आघाडी मिळाली. केवळ ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या लँकेशायरच्या २४ वर्षीय गोलंदाजासमोर हा पराभव भारताला खोलवर घाव देईल.