Ravindra Jadeja follows Nathan Lyon: सध्या सर्वत्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची चर्चा आहे. काल या कसोटी मालिकेमधला दुसरा सामना खेळला गेला. या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने ६ गडी राखत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. या विजयामुळे मालिकेमध्ये भारताने २-० अशी आघाडी मिळवली आहे. या विजयाचे खरे शिल्पकार भारतीय गोलंदाज होते. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेया या गोलदाजांच्या जोडीने ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारली. दोन्ही डावांमध्ये जडेजाने सर्वाधिक गडी बाद केले. त्याचबरोबर त्याने चांगली फलंदाजी देखील केली. उत्कृष्ट कामगिरीमुळे तो नागपूर आणि दिल्ली या ठिकाणी झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांचा सामनावीर ठरला.
रवींद्र जडेजा सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तो सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडीओंना लाखोंच्या संख्येमध्ये व्ह्यूज आणि लाइक्स असतात. ५ मिलियनपेक्षा जास्त लोक त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. पण तो कोणालाही फॉलो करत नाही. कालच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर जडेजाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तो ‘माझ्या मित्राला नॅथन लायनला पुढील २४ तासांसाठी फॉलो करणार आहे’, असे म्हणाला. त्यानंतर लायनने जडेजाची ही स्टोरी पुन्हा रिशेअर केली. या इन्स्टाग्राम स्टोरी प्रकरणामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन लायनने दिल्ली कसोटी सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली. दोन्ही डावांमध्ये मिळून त्याने भारताचे सात गडी बाद केले होते.
आशिया कपच्या एका सामन्यादरम्यान रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला काही महिन्यांची विश्रांती घ्यावी लागली होती. सप्टेंबर २०२२ पासून तो क्रिकेटपासून लांब होता. जानेवारी २०२३ मध्ये त्याने कमबॅक केले. दुखापतीमधून बाहेर आल्यानंतर लगेचच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये उत्तम प्रदर्शन केल्यामुळे पुढील सामन्यांमध्येही त्यांच्याकडून संघाला आणि चाहत्यांना अपेक्षा आहेत