*ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय व ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा

*शमी, इशांत, विजय यांच्या नावांचीही चर्चा होणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी बजावणारा रवींद्र जडेजा भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी नवी दिल्लीत शनिवारी राष्ट्रीय निवड समितीची बैठक होणार आहे.

या बैठकीत दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि संयमी सलामीवीर मुरली विजय यांच्या नावाचीही चर्चा होण्याची शक्यता आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील फलंदाज तामिळनाडूकडून विजयने सातत्यपूर्ण धावा काढल्या आहेत. परंतु शिखर धवन धावांसाठी झगडत असताना पर्यायी सलामीवीर म्हणून विजयचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला १२ जानेवारीला होणाऱ्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार असून, यात पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ निवडण्यात येणार आहे. मात्र किमान १२ खेळाडू एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा दोन्ही संघांमध्ये असतील.

रविचंद्रन अश्विनसोबत दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा अक्षर पटेलला सहज मागे टाकू शकेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पुनरागमन जोशात साजरे करताना जडेजाने २३ बळी आणि १०९ महत्त्वपूर्ण धावा काढल्या होत्या. सौराष्ट्रचा २७ वर्षीय अष्टपैलू खेळाडू जडेजा सहा महिन्यांनंतर भारतीय संघात परतू शकेल.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळणारा इशांत शर्मा एका वर्षांनंतर एकदिवसीय संघात परतू शकेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इशांतला संघात स्थान देण्यात येणार होते, मात्र रणजी सामन्यात दुखापत झाल्यामुळे कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध राहावा, या हेतूने त्याला विश्रांती देण्यात आली.

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेनंतर मोहम्मद शमीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. नुकतेच विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत त्याने पुनरागमन केले आहे. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध १० षटकांत ५२ धावांत २ बळी घेतले, तर मध्य प्रदेशविरुद्ध ८ षटकांत ४० धावांत एक बळी घेतला. शमीच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकेल. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर भारताचा मारा नेहमी अपयशी ठरत आला आहे. त्यामुळे शमी परतल्यास भारताची गोलंदाजीची फळी अधिक मजबूत होईल.

इशांत आणि शमी यांच्याशिवाय उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि मोहित शर्मा हे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. मात्र तिसरा फिरकी गोलंदाज निवडताना निवड समिती पेचात पडू शकेल. कारण हरभजन सिंग, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल असे तीन पर्याय आहेत. हरभजनने आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ४ सामन्यांत ६ बळी मिळवले होते. वेगवान गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू निवडताना मात्र निवड समितीपुढे फारसे पर्याय नाहीत. त्यामुळे स्टुअर्ट बिन्नीचे पारडे जड ठरू शकेल.

अंबाती रायुडूची गेल्या वर्षभरातील कामगिरी समाधानकारक नाही. मात्र मुरली विजयने मधल्या फळीत फलंदाजी करताना २५, ३५, ५५, ४४ अशा धावा काढल्या आहेत. याचप्रमाणे तो सलामीसुद्धा करू शकतो. मात्र धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि धोनी या फलंदाजांची दोन्ही प्रकारांमध्ये निवड होण्याची दाट शक्यता आहे. जर १६ खेळाडूंचा चमू निवडला गेला, तर पंजाबचा गुरकिराट सिंग मान संघात स्थान मिळवू शकेल.