गुजरात लायन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला पंचांच्या निर्णयाबाबत नाराजी वर्तवल्याबाबत सामनाधिकाऱ्यांकडून ताकीद देण्यात आली आहे. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात ही घटना घडली आणि त्यामुळे जडेजाला ताकीद देण्यात आली. आयपीएलच्या कलम १ यानुसार जडेजा दोषी आढळला आहे. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार त्याला ताकीद देण्यात आली आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना अक्षर पटेलचा एक चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. त्यावेळी अक्षरने जोरदार अपील केले, तर जडेजाने चेंडू बॅटला लागल्याच नसल्याचे दाखवले. त्यावेळी पंचांनी जडेजाला बाद दिले आणि तंबूत परतत असताना जडेजाना नाराजी व्यक्त केली. कालांतरानं पंचाचा निर्णय योग्य असल्याचे सर्वासमोर आले आमि जडेजाना आपली चूक मान्य केली.