Ravindra Jadeja’s Reply to Kapil Dev: माजी कर्णधार कपिल देव यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत टीम इंडियाच्या काही खेळाडूंवर अहंकारी असल्याचा आरोप केला आहे. कपिल देव म्हणाले की काही खेळाडू पैशाच्या बाबतीत अहंकारी झाले आहेत. खेळाडूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे आणि सल्ला घेण्यासाठी ते अनुभवी व्यक्तीकडेही जात नाहीत. यावर आता रवींद्र जडेजाने प्रत्युत्तर दिले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना जडेजा म्हणाला की, माजी खेळाडूंनी आपले मत व्यक्त केले पाहिजे, मात्र कपिलने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही.
कपिल देव यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना रवींद्र जडेजा म्हणाला की, जेव्हा भारत सामना हरतो तेव्हा लोक अशा कमेंट करतात. जडेजा म्हणाला की, खेळाडू फक्त भारतासाठी जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचा कोणताही वैयक्तिक अजेंडा नव्हता. रवींद्र जडेजा म्हणाला, “प्रत्येकाला आपलं मत असतं. माजी खेळाडूंना आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण मला वाटत नाही की या संघात काही अहंकार आहे. प्रत्येकजण आपापल्या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि प्रत्येकजण मेहनत करत आहे. कोणीही आणि कोणतीच गोष्ट हलक्यात घेत नाही. ते त्यांचे १०० टक्के योगदान देत आहेत. भारतीय संघ सामना हरतो तेव्हा अशा कमेंट सहसा येतात.”
संघ म्हणून चांगली कामगिरी करणे आमचा मुख्य उद्देश –
जडेजा म्हणाला, “युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेला हा चांगला संघ आहे. आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि हाच आमचा मुख्य उद्देश आहे, कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही. यापूर्वी कपिल देव म्हणाले होते की, मला विश्वास आहे की अनुभवी व्यक्ती टीम इंडियाला मदत करू शकते. पण कधी कधी खूप पैसा आला की अहंकार येतो.”
कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंवर साधला होता निशाणा –
‘द वीक’ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कपिल देव म्हणाले होते, “या क्रिकेटपटूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे. हाच फरक आहे. मी म्हणेन की असे बरेच क्रिकेटपटू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. सुनील गावस्कर असताना तुम्ही त्यांच्याशी का बोलू शकत नाही? अहंकार कुठे आहे? त्यांना वाटते की आपण पुरेसे चांगले आहोत.”