Ravindra Jadeja Retirement Speculation: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्यात सुरू आहे. या सामन्यत न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. भारताच्या फिरकीपटू जोडीने या सामन्यात उत्कृष्ट भेदक गोलंदाजी करत किवी संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. न्यूझीलंडने आता भारताला विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य दिले आहे. पण यादरम्यान भारताचा अष्टपैलू फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलदरम्यान रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात विराट कोहलीने संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला मिठी मारली. त्यानंतर अंतिम सामन्यानंतर जडेजा निवृत्त होणार असल्याचे बोलले जात आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासोबतच निवृत्तीचीही जोरदार चर्चा आहे. जडेजाने या सामन्यातील शेवटचा चेंडू ४० व्या षटकात टाकला. यानंतर कोहली त्याच्याजवळ आला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
रवींद्र जडेजाचा सामन्यातील १० षटकांचा स्पेल पूर्ण झाल्यानंतर विराटने त्याला मिठी मारली. त्यामुळे जडेजाच्या निवृत्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तो यापुढे टीम इंडियासाठी वनडेमध्ये खेळणार नसल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. मात्र, या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे येत्या काही काळात समजेल. याशिवाय याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.
रवींद्र जडेजा निवृत्त होणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण हा त्याचा शेवटचा सामना असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इतके दिवस टीम इंडियासाठी खेळल्याबद्दल आणि चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांनी भारतीय अष्टपैलू खेळाडूचे आभार मानले.
रवींद्र जडेजा नेहमीच मोठ्या सामन्यांमध्ये आपल्या चमकदार कामगिरीसाठी ओळखला जातो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीतही त्याने आपली कामगिरी चोख बजावली. जडेजाने किवी फलंदाजांना धावा करण्याची एकही संधी दिली नाही. त्याने संपूर्ण सामन्यात भेदक गोलंदाजी केली आणि १० षटकांत फक्त ३ च्या इकॉनॉमीसह ३० धावा दिल्या. यादरम्यान जडेजाने टॉम लॅथमची महत्त्वपूर्ण विकेटही घेतली.