* एकदिवसीय संघात उमेश यादवऐवजी श्रीनाथ अरविंद
* श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर अध्यक्षीय संघात
तब्बल १४ महिन्यांच्या अंतराने अष्टपैलू रवींद्र जडेजाने भारतीय कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली.
स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर २६ वर्षीय जडेजाची भारतीय संघात निवड झाली आहे. आर. अश्विनचा संघात समावेश केला असला तरी दुखापतीमुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. जडेजाचा अपवाद वगळता भारताच्या कसोटी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचप्रमाणे एकदिवसीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी श्रीनाथ अरविंदचा समावेश करण्यात आलेला आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीची बैठक झाल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी संघाची घोषणा केली.
सौराष्ट्रकडून खेळताना दोन रणजी सामन्यांत २४ बळी घेण्याची किमया साधणाऱ्या जडेजाची निवड अपेक्षितच होती. याचप्रमाणे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या वृद्धिमानचा साहाला संघात स्थान देण्यात आलेले आहे.
भारतीय संघ फलंदाजीत समतोल आहे. शिखर धवन आणि मुरली विजय सलामीवीर म्हणून जबाबदारी सांभाळतील. के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मधल्या फळीत फलंदाजी करतील. गरज भासल्यास राहुल सलामीला उतरेल. या संघात अश्विन, हरभजन सिंग आणि अमित मिश्रा हे विशेष फिरकी गोलंदाज असतील. अष्टपैलू जडेजासुद्धा फिरकी गोलंदाजी करण्यात वाकबदार आहे.
इशांत शर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असला तरी पहिल्या कसोटी सामन्यात त्याला खेळता येणार नाही. कारण श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील आक्रमक वर्तणुकीमुळे त्याच्यावर एका कसोटी सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
उर्वरित दोन एकदिवसीय सामने २२ आणि २५ ऑक्टोबरला अनुक्रमे चेन्नई आणि मुंबईला होणार आहेत, तर ५ नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतील चार सामने अनुक्रमे मोहाली, बंगळुरू, नागपूर आणि दिल्ली येथे होणार आहेत.
याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोनदिवसीय सराव सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या अध्यक्षीय संघात मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि सातत्यपूर्ण धावा करणारा फलंदाज श्रेयस अय्यर यांचा समावेश करण्यात आला आहे.
संघाच्या कामगिरीवर निवड समितीचे बारकाईने लक्ष
‘‘संघाच्या कामगिरीवर निवड समितीचे बारकाईने लक्ष आहे. संघासोबत असणाऱ्या दोन निवड समिती सदस्यांची संघव्यवस्थापन आणि कर्णधाराशी चर्चा झाली आहे. ही चिंतेची बाब नाही. भारतीय संघ जेव्हा जिंकतो, तेव्हा आपल्याला चांगले वाटते आणि हरतो, तेव्हा वाईट वाटणे स्वाभाविक आहे,’’ असे मत निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या सध्याच्या कामगिरीबाबत प्रकट केले. ‘‘आपण जिंकू शकत असलेला सामना गमावला की कोणालाही आनंद होत नाही, परंतु आम्ही निवडलेल्या संघाच्या पाठीशी राहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. भारतीय संघ कुठे कमी पडतो, याबाबत संघव्यवस्थापन आणि प्रशिक्षकांच्या चमूशी चर्चा झाली आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले. संघाच्या रचनेबाबत निवड समिती आणि कर्णधार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘कर्णधार, संघव्यवस्थापन, प्रशिक्षक आणि सर्व निवड समिती सदस्य यांच्याशी चर्चेनंतर संघाची निवड होते. अंतिम ११ खेळाडूंची निवड संघ व्यवस्थापन करते. काही गोष्टींबाबतची चिंता आम्ही मांडली आहे, त्यात सुधारणा होईल अशी आशा आहे.’’
भारतीय संघ असे-
एकदिवसीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ यष्टीरक्षक), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अक्षर पटेल, हरभजन सिंग, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, एस. अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायुडू, गुरकिराट सिंग मान.
कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, के. एल. राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण आरोन, इशांत शर्मा.
अध्यक्षीय संघ : चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, उन्मुक्त चंद, करुण नायर, श्रेयस अय्यर, नमन ओझा, हार्दिक पंडय़ा, जयंत यादव, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, नथू सिंग, कर्ण शर्मा, शेल्डन जॅक्सन.
कसोटी कारकीर्द
सामने १२
धावा ३६४
सर्वाधिक ६८
सरासरी २१.४१
बळी ४५
डावात सवरेत्कृष्ट ६/१३८
सामन्यात सवरेत्कृष्ट ७/९८
सरासरी ३०.३७