Ravindra Jadeja on Playing XI Combination for Asia Cup 2023: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सातत्याने प्रयोगांचा टप्पा सुरू आहे. कारण ३०ऑगस्टपासून आशिया कप आणि ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. अशात स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक मोठ वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, आशिया चषक आणि विश्वचषक यांसारख्या आगामी मोठ्या स्पर्धांसाठी प्लेइंग इलेव्हन संयोजन आधीच निश्चित करण्यात आले आहे.
आशिया चषक २०२३ ही स्पर्धा ३० ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळली जाणार आहे. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. त्याचबरोबर ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेतही भारत-पाकिस्तानचा सामना चांगलाच रंगतदार होणार आहे.
टीम इंडिया नवीन संयोजन वापरून पाहू शकते –
तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्यांचा सहा विकेट्सनी पराभव झाला. भारताने पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता. मालिका निर्णायक ठरण्याच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी बोलताना जडेजा म्हणाला, “आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वीची ही मालिका आहे, जिथे आम्ही प्रयोग करू शकतो. आम्ही नवीन संयोजन वापरून पाहू शकतो. यामुळे आम्हाला संघाचा समतोल राखण्यास मदत होईल. कारण यातून संघाची ताकद आणि कमकुवतपणा समजेल.”
हेही वाचा – IND vs WI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ संघ मारणार बाजी! माजी खेळाडू आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी
कॅरेबियन दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेनंतर भारताला पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. यानंतर संघ आयर्लंड दौऱ्यावर टी-२० मालिका खेळणार आहे. आयर्लंडनंतर भारत या महिन्याच्या अखेरीस सुरू होणारा आशिया कप खेळणार आहे. यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ऑक्टोबरमध्ये महत्त्वाचा वनडे विश्वचषक खेळायचा आहे. यामध्ये टीम इंडियाचा १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल.
टीम इंडियामध्ये अजिबात संभ्रम नाही –
रवींद्र जडेजा पुढे म्हणाला, “कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला माहित आहे की, ते कोणत्या संयोजनसह खेळणार आहेत. यात अजिबात संभ्रम नाही. आशिया चषकात कोणते प्लेइंग इलेव्हन संयोजन असेल, हे आम्ही आधीच ठरवले आहे. ते आधीच ठरवले आहे, पण ते प्रयत्न करत आहेत की, जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत त्यांना अतिरिक्त फलंदाज खेळवायचा असल्यास, तो कोण असेल आणि तो कसा असेल आणि कोणत्या क्रमांकावर खेळेल.”
हेही वाचा – ऑस्ट्रेलियाला पाचव्या कसोटीत नमवत इंग्लंडची मालिकेत २ – २ बरोबरी
युवा खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय अनुभवाची गरज –
मंगळवारी होणाऱ्या वनडे मालिकेतील निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारत युवा जोशसोबत मैदानात उतरेल, असे मानले जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवाबद्दल बोलताना जडेजा म्हणाला की, “या पराभवामुळे आम्ही निराश झालो नाही. प्रयोगांमुळे आम्ही सामने हरलो नाही, कधीकधी परिस्थिती महत्त्वाची असते. आम्ही वेगवेगळ्या संयोजनचा प्रयत्न करत आहोत. आम्ही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये वेगवेगळे फलंदाज आजमावू शकतो. ही अशी मालिका आहे जिथे आपण बदल करू शकतो. युवा खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय अनुभवाची गरज आहे. त्यांनाही मॅच सरावाची गरज आहे.”