WTC 2023 Final India vs Australia : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने कमाल केली आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग सुरु असताना जडेजाने आतापर्यंत २ विकेट घेतल्या आहेत. या २ विकेट्सच्या जोरावर जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जडेजा आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज बनला आहे. त्याने अशी कामगिरी करून बिशन सिंग बेदी यांचा विक्रम मोडला आहे.
बेदी यांनी डावखुरा फिरकीपटू गोलंदाज म्हणून भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये २६६ विकेट घेतल्या होत्या. आता जडेजाच्या नावावर २६७ विकेट्सची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये डावखुरा फिरकीपटू म्हणून सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या रंगना हेराथच्या नावावर आहे. हेराथने कसोटी क्रिकेटमध्ये ४३३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे. तर, न्यूझीलंडचा डॅनियल विटोरीने कसोटीत ३६२ विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय इंग्लिश गोलंदाज डेरेक अंडरवुडने कसोटीत २९७ विकेट्स घेण्याची कमाल केलीय. त्यानंतर जडेजाने या क्रमवारीत बाजी मारली आहे. जडेजाने आतापर्यंत ६५ कसोटी सामन्यात २६७ विकेट घेतल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये ४६९ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताच्या पहिल्या इनिंगला २६९ धावांवर गारद केलं. त्यानंतर १७३ धावांचा लीड घेत दिवस संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने आणखी २९६ धावा फलकावर लावल्या.
भारताला या सामन्यात टीकून राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उर्वरित ६ विकेट लवकर घ्यावे लागतील आणि फलंदाजीने चांगली कामगिरी करावी लागेल.दिवसाचा खेळ संपेपर्यंत मार्नस लाबुशेन ४१ आणि कॅमरून ग्रीन ७ धावांवर नाबाद आहे. भारताकडून जडेजाने २ विकेट घेतल्या आहेत. तर सिराज आणि उमेश यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.