भारताचा आणि इंडियन प्रीमिअर लीगमधल्या गुजरात लायन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा रविवारी विवाहबंधनात अडकणार आहे. राजकोट येथे यांत्रिकी अभियंता असलेल्या रिवा सोळंकीशी त्याचा विवाह होणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शनिवारच्या सामन्यासाठी तो संघासोबत मुंबईत आला नाही.
सामन्यामुळे गुजरात लायन्स संघातील खेळाडूंना जडेजाच्या विवाहाला उपस्थित राहता येणार नाही, परंतु त्याच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला संपूर्ण संघ उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ‘‘जडेजा २१ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे की नाही, याबाबतही साशंकता आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले आहे. जडेजा हा आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात लायन्स संघाचा मुख्य खेळाडूंपैकी एक आहे.