India vs South Africa, World Cup 2023: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताच्या डावात विराट कोहलीने १२१ चेंडूत १०२ धावांची नाबाद खेळी केली. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वन डे शतकांची बरोबरी केली आहे. या विश्वचषकात विराटने आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८३ धावांवर गडगडला. २०२३च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला पुरस्कार देते. आतापर्यंत के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडू आहेत ज्यांनी हा पुरस्कार दोनदा जिंकला आहे. यावेळी संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे नाव विशिष्ट पद्धतीने जाहीर केले.
प्रशिक्षकाने सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे नाव खास पद्धतीने सांगितले
दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय मिळविल्यानंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्याला सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून घोषित केले. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे नाव देण्यापूर्वी प्रशिक्षक म्हणाले, “संघातील प्रत्येक सदस्य ही त्या संघाची ताकद असते.” ते पुढे म्हणाले, “आज एका नव्या खेळाडूला हे पदक मिळणार आहे. सूर्यकुमार यादवने मैदानावर आपला वेग आणि मेहनत दाखवून दिली. जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक त्यांचे काम करत आहेत. मात्र, असा एक खेळाडू आहे ज्याच्या वाट्याला जरी काहीही आले नाही तरी त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने याआधी उत्तम क्षेत्ररक्षण आणि झेल घेतले आहेत. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्यांना प्रोफेसर करतो कारण, तो क्षेत्ररक्षकांना त्यांच्या जागी पाठवतो आणि उत्तम निर्णय देखील घेतो.”
असे म्हणत प्रशिक्षकाने संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे बोट दाखवले. यानंतर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे नाव घेण्यापूर्वी, त्याने सर्व खेळाडूंना ड्रेसिंग रुमच्या बाहेर नेले आणि कॅमेऱ्यासमोर उभे केले. सर्व खेळाडूंसमोर कॅमेरा पॅन करण्यात आला आणि नंतर तो कॅमेरा कर्णधार रोहित शर्मासमोर थांबला. सर्व भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला आणि यानंतर श्रेयस अय्यरने कर्णधार रोहित शर्मा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक प्रदान केले. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी कर्णधार रोहित शर्माला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहितने एकही झेल घेतला नाही आणि धावबादही केलं नाही. तरीही रोहित शर्माला सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी पदक देण्यात आले. काय होते यामागचे कारण? जाणून घेऊ या.
रोहितला हा पुरस्कार देण्यामागचे कारण क्षेत्ररक्षण प्रशिक्षकानेच सांगितले. टी. दिलीप यांनी सांगितले की, “सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार फक्त झेल आणि धावबादसाठी दिला जात नाही. तर, हा पुरस्कार तुमच्या मैदानावरील प्रयत्न, रणनीती आणि आखलेली योजना यासाठी दिला जातो. रोहित शर्मा या बाबतीत खूप पुढे होता.” एवढेच नाही तर दिलीपने पुढे सांगितले की, “रोहित शर्माने ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धावा केल्या आणि क्षेत्ररक्षण लावले होते ते खूप खास होते. त्यामुळेच सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार रोहित शर्माला मिळाला.” विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाने ग्रुप मॅचमध्ये सलग आठवा विजय मिळवला आहे. १२ नोव्हेंबरला बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे.