भारत आणि विंडीज यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या डावात ६४९ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या तिघांनी शतकी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. जडेजाने तर शेवटच्या काही षटकांमध्ये लहान वयोगटातील गोलंदाजांना ज्याप्रमाणे चोपून काढतात, तसे झोडपले. १३२ चेंडूत नाबाद १०० धावा करत त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्यामुळे त्याची सर्वत्र वाहवा झाली. पण त्यानंतर विंडीजची फलंदाजी सुरु असताना मात्र जडेजाने ज्या पद्धतीने हेटमेयरला धावचीत केले, ते आंतरराष्ट्रीय कसोटी रँकिंगमध्ये अग्रस्थानी असलेल्या भारतासाठी लाज वाटेल असे होते.
मुळातच अत्यंत दुबळा असलेला विंडीजचा संघ ६५० धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला. विंडीजने अवघ्या २१ धावांवर ३ गडी गमावले. त्यानंतर विंडीजचा चौथा गडी ३२ या धावसंख्येवर बाद झाला. हेटमेयर आणि अम्बरीस हे दोन फलंदाज मैदानावर होते. अश्विनच्या गोलंदाजीवर फलंदाजाने चेंडू टोलवला. त्यानंतर हेटमेयर व अम्बरीस या दोघांमध्ये धाव घेण्यावरून गोंधळ उडाला. या दरम्यान दोन्ही फलंदाज यष्टिरक्षक असलेल्या बाजूला पोहोचले. विकेट वाचवण्यासाठी या दोघांपैकी एकाला गोलंदाजाच्या बाजूला पोहोचणे गरजेचे होते. पण चेंडू जडेजाच्या हातात असल्याने फलंदाजाने आशा सोडली होती. मात्र, तो क्रीझच्या दिशेने येत होता. अशावेळी अश्विन जो स्टंपच्या बाजुला उभा होता, व चेंडू दे असं जाडेजाला सांगत होता, त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून जाडेजा फलंदाजाला खिजवत आरामात हातात चेंडू घेऊन चालत चालत स्टंपच्या दिशेने येत होता. इलाज नसलेला फलंदाज क्रीझच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात असताना, लगोरी फोडतात किंवा गोट्या खेळताना नेम धरतात, त्याप्रमाणे अविर्भाव करून जाडेजानं चेंडू फेकला व हेटमेयरला धावबाद केले.
When sir Jadeja bats he want Century, when he was on field he want Run-out nd when he is bowling he wants wicket Wowww!!! @imjadeja #INDvWI pic.twitter.com/PBeEzyAZB1
; Sagar Kabir (@ImSagarKabir10) October 5, 2018
अन्य भारतीय क्षेत्ररक्षकांच्या हावभावांवरून त्यांनाही जाडेजाचं असं वागणं खटकल्याचं जा़णवत होतं, परंतु अत्यंत बालिश हातवारे करत जाडेजा या सगळ्याचा मजा घेताना दिसत होता.
रवींद्र जडेजा हा उत्तम क्षेत्ररक्षक आहे. त्याची गणना जगातील सर्वोकृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. अशा खेळाडूने अशा पद्धतीची ‘चिंधीगिरी’ करणे हे कितपत शोभते? विंडीजचा संघ हा काही कारणास्तव भारतापेक्षा दुबळा आहे, हे क्रिकेटप्रेमींनाही माहिती आहे. पण एखादा संघ कितीही दुबळा असला, तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना अशा पद्धतीचा बालिशपणा करणे योग्य आहे? क्रिकेट हा खेळ दर्जात्मक मानला जातो. मैदानावरील शिष्टाचारांचा जेव्हा विषय निघतो, तेव्हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंच्या नावाचे दाखले दिले जातात. आणि याच भारतीय संघाच्या खेळाडूने (विशेषतः अनुभवी खेळाडूने) अशा पद्धतीचे ‘गल्ली क्रिकेट’लाही न शोभणारे वर्तन करणे हे क्रिकेटप्रमींना कधीही रुचणार नाही.
संघ किंवा खेळाडू हा कितीही मोठा असला, तरी खेळामुळे खेळाडू असतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. क्रिकेटचा दर्जा लक्षात घेणे आणि तो सांभाळणे, हेच खरे शहाणपण आहे. जडेजाने सामन्यात शतक ठोकले, पण या ‘बालिश’ कृत्यापुढे त्याचे ‘शतक’ कित्येकांना लक्षात राहिल? हा खरा प्रश्न आहे.