प्रशांत केणी

‘फुल’राणी सायना नेहवाल म्हणजे भारतीय क्रीडा क्षेत्रातील युगप्रवर्तक. क्रिकेटवेडय़ा देशात बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोन, पुलेला गोपीचंद यांनी जरी ऐतिहासिक यश बऱ्याच वर्षांपूर्वी मिळवले असले तरी सायनाच्या यशाने हा खेळ भारतात लोकप्रिय झाला. खेळात पैशाचा ओघ सुरू झाला. परंतु आता ३२ वर्षांच्या सायनाची कारकीर्द निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे. सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे तंदुरुस्ती राखणे एकीकडे कठीण झाले असताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्यापुढे असंख्य आव्हाने उभी राहिली आहेत. पण तरीही ती खेळते आहे. तूर्तास, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि उबर चषक स्पर्धेसाठी थेट प्रवेश न दिल्याबद्दल सायनाने अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेवर टीका केली आहे. त्यामुळे खेळ मोठा की खेळाडू हा प्रश्न क्रीडाजगतात चर्चेचा विषय ठरत आहे.

बॅडमिंटन या खेळाची पाळेमुळे इतिहासात भारताशी नाते सांगत असली तरी हा खेळ येथे सायनाच्या कामगिरीमुळे आणि गोपीचंद यांच्या दृष्टिकोनामुळे रुजला. तशी सायनाच्या यशोगाथेला सुरुवात २००८पासून झाली. पण २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने पटकावलेले कांस्यपदक हे पुढील यशाची मुहूर्तमेढ रोवणारे ठरले. यानंतर तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके कमावली. उबर चषकाची दोन कांस्यपदकेसुद्धा तिच्या खात्यावर आहेत. याशिवाय ऑल इंग्लंड अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठणारीसुद्धा ती पहिलीच. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू हासुद्धा पराक्रम तिच्या नावावर आहे. त्यामुळे सायनाचा यशोध्याय प्रेरणादायी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण कालांतराने पी. व्ही. सिंधूने आंतरराष्ट्रीय क्षितिजावर पराक्रम गाजवताना सायनापेक्षाही एक पाऊल पुढे टाकले. गेल्या काही वर्षांत मालविका बनसोड, आकर्षी कश्यप आणि तस्निम मिर ही नवी पिढी उदयास येत आहे. त्यामुळे सायनाचे मोठेपण यित्कचितही कमी झालेले नाही. पण वयानुसार कारकीर्दीचा खाली येणारा आलेख स्वीकारणे सायनाला कठीण जात आहे.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे सायनाला गटसाखळीतच गाशा गुंडाळावा लागला. खरे तर ऑलिम्पिक पदकाच्या ईर्षेने अतिसरावाचा फटका सायनाला बसला. मग २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी ती पात्रच ठरू शकली नाही. कारण महिला एकेरी क्रमवारीतील अव्वल १६ क्रमांकांच्या खेळाडूंनाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवण्याचा निकष लावण्यात आला. सायना क्रमवारीत २२व्या क्रमांकावर होती.

आता भारतीय बॅडमिंटन संघटनेनेही राष्ट्रकुल, एशियाड आणि थॉमस-उबर चषकासाठी संघनिवड करताना जागतिक क्रमवारीतील पहिल्या १५ क्रमांकांवरील खेळाडूंना निवड चाचणीपासून सवलत दिली आहे. हाच नियम बी. साईप्रणीत, अश्विनी पोनप्पा यांनीही स्वीकारला आहे. पण २३व्या क्रमांकावरील सायनाला तो मान्य नाही. युरोपातून सलग तीन स्पर्धा खेळून आलेली सायना २६ एप्रिलपासून आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार आहे. पण निवड चाचणीत न खेळल्याने तिचा संघनिवडीसाठी विचार होणार नाही, हे स्वाभाविक आहे. परंतु संघटना मला या प्रतिष्ठेच्या स्पर्धापासून रोखण्यात धन्यता मानत आहे, अशा प्रकारची टिपण्णी करीत सायनाने आपला मोठेपणाच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

सायनाने २०१८च्या राष्ट्रकुलमध्ये महिला एकेरीत आणि मिश्र दुहेरीत अशी दोन सुवर्णपदके कमावली होती. याचप्रमाणे आशियाई स्पर्धेतही तिच्या खात्यावर कांस्यपदक होते. याच यशाच्या बळावर आपली पुनर्निवड व्हावी, असे सायनाचे मत आहे. परंतु ‘बीडब्ल्यूएफ’ आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील सायनाची कामगिरी मुळीच समाधानकारक नाही. २०१९मध्ये इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत तिने अखेरचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅरोलिना मरिनने दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याआधीचे तिचे जेतेपद २०१७मध्ये मलेशिया खुल्या स्पर्धेतील होते. गेल्या दोन वर्षांत ओर्लेन्स चषक स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंतची मजल वगळता अन्य स्पर्धामध्ये तिने पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच गाशा गुंडाळला आहे. पूर्णत: तंदुरुस्त नसताना जानेवारीमध्ये इंडिया खुल्या स्पर्धेत खेळण्याची चूक सायनाला भोवली. उदयोन्मुख मालविकाने सरळ गेममध्ये तिचा पराभव केला. यंदाच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत जपानच्या अकानी यामागुचीला तिने दिलेली लढत प्रशंसनीय होती. पण तरीही तिचा दुसऱ्या फेरीत निसटता पराभव झाला. दुखापती आणि त्यातून सावरण्यासाठी लागणारा कालावधी कारकीर्द अस्ताला चालल्याची ग्वाही देत आहे. त्यामुळेच आगामी तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये सायनाकडून पदकाची खात्री देता येत नाही. पण सायनाला कारकीर्दीपुढे पूर्णविराम नको आहे. निवड चाचणीतील सहा-सात सामन्यांमधील सिद्धता टाळून पूर्वयशाच्या बळावर स्थान हवे आहे.

prashant.keni@expressindia.com