MI vs RCB Highlights in Marathi: WPL 2025 च्या अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सलग पाच सामने गमावलेल्या गतविजेत्या आरसीबीच्या संघाने मुंबईवर ११ धावांनी मोठा विजय नोंदवला. यासह मुंबई इंडियन्सचा संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आजवर एकही सामना गमावला नव्हता, पण आरसीबीने मुंबईचा ११ धावांनी पराभव करत एक मोठा ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात विजय नोंदवत मुंबई इंडियन्सला थेट फायनलचे तिकिट मिळवण्याची संधी होती, पण आरसीबीने मुंबईच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं.
अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी २८ धावांची गरज होती. सजना सजीवनने २ षटकार लगावत संघाच्या विजयाच्या आशा उंचावल्या. पण पाचव्या चेंडूवर झेलबाद होत आरसीबीने सामन्यात पुनरागमन करत एलिस पेरीने संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स संघाला खराब फिल्डिंगचा फटका बसला. संघाने अनेक झेल सोडले तर सीमारेषेजवळ चौकार अडवण्यातही खेळाडू अपयशी ठरले. यासह आरसीबीकडून मेघना आणि स्मृती मानधनाने संघाला वादळी सुरूवात करून दिली. एस मेघनाने २६ धावा तर स्मृती मानधनाने३७ चेंडूक ३ षटकार आणि ६ चौकारांसह अर्धशतक करत ५३ धावा केल्या. तर एलिस पेरी ४९ धावा करत नाबाद परतली. आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूने संघाच्या धावांमध्ये मोठी भर घातली. पेरीनंतर रिचा घोषने ३६ धावा आणि जॉर्जिया वेयरहमने ३१ धावांची शानदार खेळी करत १९९ धावा केल्या आणि मुंबईला २०० धावांचे आव्हान दिले.
आरसीबीने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने ९ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या. पण लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला चांगली सुरूवात मिळाली नाही आणि स्नेह राणाने मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडले. हिली मॅथ्यूज १९ धावा तर अमेलिया कर ९ धावा करत बाद झाली. यानंतर संघाला मोठा धक्का हरमनप्रीत कौरच्या रूपात लागला. हरमनप्रीत कौर २० धावा करत लवकर बाद झाली. तर नॅट स्किव्हर ब्रंटने उत्कृष्ट ३५ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांसह उत्कृष्ट ६९ धावांची खेळी केली. तर सजना सजीवन २३ धावा करू शकली आणि संस्कृती गुप्ताने १० धावांचे चांगले योगदान दिले.
यासह आता मुंबई इंडियन्सचा संघ १३ मार्चला गुजरात जायंट्स संघाविरूद्ध एलिमिनेटर सामना खेळणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचल्याने आता १५ मार्च शनिवारी एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी फायनल खेळताना दिसेल.