Palash Muchhal shared a photo with Smriti Mandhana : रविवारी रात्री डब्ल्यूपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने २ गडी गमावून सामना जिंकला. आरसीबीच्या विजयानंतर कर्णधार स्मृती मंधाना बॉलिवूड संगीतकार पलाश मुच्छलसोबत दिसली. पलाशने स्मृतीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. स्मृती आणि पलाश याआधीही अनेक वेळा एकत्र दिसले आहेत.
२८ वर्षीय पलाश हा संगीतकार आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा धाकटा भाऊ आहे. रविवारी झालेल्या सामन्याचा त्यांनी चांगलाच आनंद लुटला. पलाशने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्मृतीसह ट्रॉफी हातात घेऊन एक फोटो पोस्ट केला आहे. तो स्मृतीच्या खांद्यावर हात ठेवून पोझ देताना दिसत आहे. आता दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. २०२३ मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले, तेव्हा पलाशने स्मृतीसह फोटोसाठी पोज देताना दिसला होता.
भारतीय क्रिकेट संघाची खेळाडू हरलीन देओलने या फोटोवर कमेंट केली आहे. हरलीनसह इतर क्रिकेटपटूंनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. स्मृतीचे नाव अनेक दिवसांपासून पलाशबरोबर जोडले गेले आहे. पलाशने एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एक गाणे स्मृतीला समर्पित केले होते. यासोबतच त्याने आपल्या प्रेमाची कबुलीही दिली होती. मात्र, स्मृतीने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
बऱ्याचदा सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसून मुच्छल मंधानाला सपोर्ट करताना दिसला आहे. मंधाना जिथे जिथे मॅच खेळायला जाते तिथे तिथे हजर राहून तिला सपोर्ट करतो. तो अनेकदा भारतीय जर्सी परिधान करताना दिसला आहे. दोघेही सोशल मीडियावर अनेकवेळा एकत्र फोटोंमध्ये दिसले आहेत. पलाश आणि स्मृती मंधाना गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि ते सोशल मीडियावर नियमितपणे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत आहेत.
उल्लेखनीय आहे की महिला प्रीमियर लीग २०२४ चा अंतिम सामना आरसीबी आणि दिल्ली यांच्यात झाला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने शफाली वर्माच्या ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर १८.३ षटकांत ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने २ गडी गमावून १९.३ षटकांत सामना जिंकला. आरसीबीसाठी स्मृती मंधानाने ३९ चेंडूंचा सामना करत ३१ धावा केल्या. तिने ३ चौकार मारले.
हेही वाचा – आव्हानांचा निडरपणे सामना केल्यानेच अश्विन यशस्वी! भारताचा माजी कर्णधार कुंबळेकडून स्तुती
एलिस पेरीने ३७ चेंडूंचा सामना करता ४ चौकार मारत ३५ धावा केल्या. त्याचबरोबर सोफिया डिव्हाईनने ३२ धावांची खेळी केली. रिचा घोषने नाबाद १७ धावा केल्या.यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली, तर एलिस पेरी पहिल्या क्रमांकावर आहे. तिने ९ सामन्यात ३४७ धावा केल्या आहेत. मेग लॅनिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने ९ सामन्यात ३३१ धावा केल्या आहेत.