आयपीएल २०२१ स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकाताने बंगळुरूला ४ गडी आणि २ चेंडू राखून पराभूत केलं. या पराभवानंतर विराट कोहलीचं आयपीएल चषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. विराटच्या नेतृत्वाखाली बंगळुरूचा हा शेवटचा सामना होता. यानंतर विराट संघाचं नेतृत्व करणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

“आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. मात्र कोलकात्याच्या फिरकीपटूंनी मधली षटकं चांगली टाकली. त्यांनी चांगल्या गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन केलं आणि गडी बाद करत राहिले. पुढील फेरीत जाण्यासाठी ते पूर्णपणे पात्र आहेत. मधल्या एका षटकात २२ धावा आल्याने आमची संधी कमी झाली होती. तरी आम्ही शेवटच्या षटकापर्यंत लढा दिला. सुनील नरिन एक चांगला गोलंदाज आहे. त्याने हे पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे.” असं कोलकात्याचं कौतुक करताना विराट कोहलीने सांगितलं.

“मी संघात एक संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरुणांना स्वतंत्र्यपणे खेळण्याची संधी दिली. मी हे भारतीय संघातही केलं आहे. मी माझे सर्वोत्तम दिले. मला कसा प्रतिसाद मिळाला माहिती नाही. पंरतु प्रत्येक वेळी फ्रँचायसीला १२० टक्के दिलं. ते आता मी एक खेळाडू म्हणून करेन. पुढच्या तीन वर्षांसाठी पुन्हा एकत्र येण्याची आणि पुनर्रचना करण्याची एक संधी आहे. मी बंगळुरूसोबत असणार आहे. मला निष्ठा महत्त्वाची आहे. आयपीएलमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत बंगळुरू संघात खेळेन”, असंही विराट कोहलीने सांगितलं.

विराटच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने १४० सामने खेळले आहेत. यापैकी ६६ सामन्यात विजय, तर ७० सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर ४ सामन्याचा निकाल लागला नाही.