आधुनिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. यासोबतच ३७ वर्षीय डिव्हिलियर्सने आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबतचाही प्रवास थांबवला. डिव्हिलियर्सने २०११ मध्ये आरसीबीकडून खेळण्यास सुरुवात केली आणि त्याने ११ हंगाम खेळले आहेत. त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी १५६ सामन्यात ४४९१ धावा केल्या. आरसीबीसाठी तो कोहलीनंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तो म्हणाला, “मी आरसीबीकडून बराच काळ खेळलो. नुकतीच ११ वर्षे झाली आणि आता संघ सोडणे हा आंबट गोड अनुभव आहे. हा निर्णय घ्यायला खूप वेळ लागला पण माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मी खूप विचार करून हा निर्णय घेतला. मी आरसीबी व्यवस्थापन, माझा मित्र विराट कोहली, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, चाहते यांचे आभार मानू इच्छितो. आरसीबी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असेल आणि आम्ही या संघाला नेहमीच प्रोत्साहन देत राहू.”

एबी डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “मी आयुष्यभर आरसीबियन राहणार आहे. आरसीबीच्या सेटअपमध्ये प्रत्येकजण माझ्यासाठी एक कुटुंब बनला आहे. लोक येतात आणि जातात, पण आरसीबीची एकमेकांबद्दलची भावना आणि प्रेम नेहमीच राहील. मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.”

डीव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर आरसीबीनेही ट्वीट केले. “एका युगाचा अंत! तुझ्यासारखा कोणी नाही, एबी… आरसीबीमध्ये आम्हाला तुझी खूप आठवण येईल. तुम्ही संघाला, चाहत्यांना आणि सर्वसाधारणपणे क्रिकेट प्रेमींना जे काही दिले त्याबद्दल एबीचे आभार… निवृत्तीच्या शुभेच्छा, लीजेंड!”, असे आरसीबीने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – …तर आज द्रविड नव्हे, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग बनला असता टीम इंडियाचा हेड कोच!

डिव्हिलियर्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. एबीने १८४ आयपीएल सामन्यांमध्ये ५१६२धावा केल्या ज्यात तीन शतके आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात त्याने ६ डावात २०७ धावा केल्या. मात्र, यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या लेगमध्ये एबीला प्रभाव पाडता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb changed my life i have become half indian now says ab de villiers watch video adn