ख्रिस गेल, विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स हे गोलंदाजांवर मर्दुमकी गाजविणारे त्रिकूट म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खासियत. बाद फेरीतील स्थान निश्चित करणे, हे आता बंगळुरूसाठी मुश्कील मुळीच नाही. परंतु रविवारी त्यांची गाठ पडणार आहे ती कोलकाता नाइट रायडर्सशी. गतविजेतेपद गाठीशी असणारा कोलकात्याचा संघ अनिश्चित खेळासाठी ओळखला जातो. याचेच दडपण बंगळुरूवर आहे. भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीच्या शहरातील झारखंड क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्टेडियम रविवारी आयपीएल पदार्पण सामन्यासाठी सज्ज झाले आहे.
महिन्याभरापूर्वी बंगळुरू आणि कोलकाताचा संघ एकमेकांशी भिडले होते. त्या सामन्यात ख्रिस गेलने कोलकात्याच्या गोलंदाजांची कत्तल करीत ५० चेंडूंत ८५ धावांची लयलूट केली होती. त्यात नऊ षटकारांचा समावेश होता. गेलची वादळी फलंदाजी आणि अन्य खेळाडूंची सांघिक कामगिरी या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल चौघांमध्ये समाविष्ट आहे. तथापि, सांघिक सूर न जुळलेला कोलकात्याचा संघ तळाच्या चौघांमध्ये आहे. दोन्ही संघांनी मागील सामन्यात विजय मिळवल्यामुळे या सामन्यात त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. कोलकाताने दुबळ्या पुणे वॉरियर्सवर मात केली होती, तर बंगळुरूने शुक्रवारी रोमहर्षक लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सला हरविले होते. या सामन्यात कप्तान कोहलीने ५८ चेंडूंत ९९ धावांची स्फोटक खेळी साकारली होती. चेतेश्वर पुजाराही संघात सामील झाल्यामुळे बंगळुरूची फलंदाजीची ताकद अधिक मजबूत झाली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सची परिस्थिती नेमकी भिन्न आहे. त्यांच्या फलंदाजीच्या मर्यादा नेहमीच स्पष्ट झाल्या आहेत. पुण्याविरुद्ध कप्तान गौतम गंभीरने अर्धशतक साकारून आशा दाखवल्या. परंतु त्यांचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस फॉर्मशी झगडत आहे. महागात खरेदी केलेल्या युसूफ पठाणची कामगिरीही यथातथाच आहे.
सामना : कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू.
स्थळ : झारखंड क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची.
वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.