विराट कोहली जिथून क्रिकेटपटू म्हणून घडला, त्याच दिल्लीत रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध विजय मिळवून बाद फेरी गाठण्याचे ध्येय दिल्लीने जपले आहे. ऋषभ पंतच्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या बळावर दिल्लीचा संघ विजेतेपदाच्या दिशेने कूच करीत आहे.

कोलकाता येथे १९ एप्रिलला पराभवाची प्रदीर्घ मालिका खंडित केल्यापासून कोहलीच्या बेंगळूरु संघाने आत्मविश्वासाने कामगिरी केली आहे. फिरोझशाह कोटला स्टेडियम बेंगळूरुसाठी यशदायी ठरत आलेले आहे. कारण या मैदानावरील मागील तिन्ही सामन्यांत बेंगळूरुने विजय मिळवलेला आहे. त्यामुळे बेंगळूरुला हरवणे रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांच्या मार्गदर्शनाखालील दिल्लीसाठी फारसे सोपे नसेल.

दिल्लीचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना आणखी एक विजय पुरेसा ठरेल. दिल्लीची घरच्या मैदानावरील कामगिरी फारशी समाधानकारक नाही. परंतु दोन सलग पराभवांनंतर एक विजय मिळवणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

बेंगळूरुने कामगिरीत सुधारणा करीत मागील तीन सामन्यांत अनुक्रमे कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांना पराभूत केले आहे. त्यामुळे आणखी एका विजयासह बेंगळूरुला सातवे स्थान गाठता येईल. त्यांच्या खात्यावर ११ सामन्यांत ८ गुण जमा आहेत.

दिल्लीकडे अनुभवी आणि युवा फलंदाजांचे योग्य मिश्रण आहे. राजस्थानविरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी ७२ धावांच्या सलामीसह भक्कम पाया रचला. मग ऋषभ पंतने नाबाद ७३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. याशिवाय अय्यर आणि कॉलिन इन्ग्राम यांच्यासारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत.

दिल्लीच्या गोलंदाजीची मदार कॅगिसो रबाडावर असली तरी त्यांच्याकडे वैविध्यपूर्ण मारा आहे. यात मध्यमगती गोलंदाज इशांत शर्मा, वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस यांच्यासह संदीप लॅमिछाने, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल अशा फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे.

बेंगळूरुकडे एबी डी’व्हिलियर्स, कोहली, मोईन अली, मार्कस स्टाइनिस यांच्यासारखे दर्जेदार फलंदाज आहेत. मात्र नॅथन कोल्टर-नाइल, डेल स्टेन यांच्या अभावामुळे त्यांची गोलंदाजी दुबळी झाली आहे. परंतु नवदीप सैनी लक्षवेधी गोलंदाजी करीत आहे.

  • सामन्याची वेळ: दुपारी ४ वा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १