इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित पर्वामधील दुसऱ्या सामन्यात सोमवारी कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा धुव्वा उडवला. गोलंदाजांनी केलेल्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर कोलकाताच्या संघाने आरसीबीवर हा विराट विजय मिळवला. पहिल्यांदा गोलंदाजी करताना फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने १३ धावा देत आरबीसीचे तीन गडी तंबूत पाठवले तर आंद्रे रसेलने ९ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करत वरुणला चांगली साथ दिली. प्रभावी गोलंदाजीनंतर शुभमन गिलनं केलेल्या ४८ धावा आणि पदार्पणामध्येच व्यंकटेश अय्यरने केलेल्या नाबाद ४१ धावांच्या जोरावर केकेआरने नऊ गडी आणि ६० चेंडू राखून आरसीबीला पराभूत केलं. विशेष म्हणजे या सामन्यानंतर भारतीय संघाचा तसेच आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने वरुण चक्रवर्तीचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

आरसीबीने कोलकातासमोर अवघ्या ९३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. कोलकाताने ६० चेंडूंमध्येच लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला असला तरी केकेआरच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजीचीच अधिक चर्चा सामन्यानंतरही पहायला मिळाली. कोलकाताच्या गोलंदाजीसमोर आरसीबीच्या संघातील दिग्गजांनी गुडघे टेकले. कोहलीला केवळ पाच धावा करता आल्या. मॅक्सवेलला चार धावा करुन तर डिव्हिलियर्स आणि हसारंगा हे दोघे तर पहिल्याच चेंडूवर बाद झाले. केकेआरच्या गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीमुळे आरसीबीला तिहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. सामन्यानंतर विराटने या पराभवामुळे आमचे डोळे उघडल्याचं सांगितलं. तसेच पराभव का झाला यासंदर्भातही विराटने आपलं मत मांडलं. इतकचं नाही तर सामनावीर पुरस्कार मिळालेल्या वरुण चक्रवर्तीचं विराटने फार कौतुक केलं.

“हा पराभव आमचे डोळे उघडण्यासाठी पुरेसा आहे. या खेळपट्टीवर चांगल्या पार्टनरशीपची गरज होती. खरं सांगायचं झालं तर सामन्यादरम्यान एवढ्या लवकर दवबिंदूंचा परिणाम दिसून येईल असं वाटलं नव्हतं. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली वाटत होती. एका वेळी आमची धावसंख्या ४२ वर एक गडी बाद अशी होती. नंतर २० धावांमध्ये आम्ही पाच गडी गमावले. त्यानंतर पुनरागमन करणं शक्य नव्हतं. हा सामना आमचे डोळे उघडणारा होता. आता आम्हाला कोणत्या दिशेने काम करायचं आहे हे ठाऊक झालंय,” असं विराट सामन्यातील पराभव का झाला याबद्दल बोलताना म्हटला.

विराटने आरसीबीच्या डावाला आपल्या फिरकीत गुंडाळणाऱ्या वरुन चक्रवर्तीचं फार कौतुक केलं. इतकच नाही तर विराटने वरुण चक्रवर्तीला भारतीय संघाचं भविष्य असं म्हटलं आहे. विराटने आपण डगआऊटमध्ये बसून वरुण चक्रवर्तीबद्दलच बोलत असल्याचं सांगितलं. “त्याने फार सुंदर गोलंदाजी केली. मी डगआऊटमध्ये बसून म्हणत होतो की वरुण आपल्यासाठी (भारतीय संघासाठी) एक महत्वाचा खेळाडू ठरु शकतो असंही मी म्हटलं. आम्हाला तरुण खेळाडूंकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे की ज्यामुळे भारताची बेंच स्ट्रेंथ अधिक मजबूत होईल. वरुण लवकरच भारतीय संघासाठी खेळणार असून ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे,” असं विराट म्हणाला.

वरुण चक्रवर्तीला टी २० विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आलं असून या सामन्यातील कामगिरीच्या माध्यमातून वरुणने त्याची निवड योग्य असल्याचं ठरवलं आहे. चक्रवर्तीने चार षटकांमध्ये १३ धावा देत तीन गड्यांना तंबूत पाठवलं आणि सामनावीर पुरस्कारही जिंकला.