महिला प्रीमियर लीग २०२३ चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. रविवारी (५ मार्च) दुपारी सुरू झालेल्या या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डब्ल्यूपीएलचा हा पहिला हंगाम असून आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्यांदाच आमने सामने आले आहेत. भारताची धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा आणि दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने तुफानी अर्धशतकं झळकावत नवा इतिहास रचला. दीडशतकी भागीदारीच्या जोरावर विजयासाठी बंगळूरसमोर २२४ धावांचे आव्हान ठेवले.
फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली संघाची सुरुवात अतिशय अप्रतिम झाली. कर्णधार मेग लॅनिंग आणि सलामीवीर शफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी तब्बल १६२ धावांची ऐतिहासिक भागीदारी झाली. त्यात ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने ४३ चेंडूत ७२ धावांचे योगदान दिले. यात मेगने १४ चौकार लगावले. तर शफाली वर्माने ४५ चेंडूत ८४ आक्रमक खेळी केली. शफालीने तिच्या खेळीला १० चौकार आणि ४ षटकारांचा साज चढवला.
अखेर हैदर नाइटला ही जोडी फोडण्यात यश आले. तिने कर्णधार मेग लॅनिंगला त्रिफळाचीत केले. तर शफालीला रिचा घोषकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या मारिजन कॅप आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी ६० धावांची अभेद्य भागीदारी केली ज्यामुळे दिल्ली २०० पार पोहोचली. मारिजन कॅपने १७ चेंडूत ३९ धावा केल्या त्यात तिने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. जेमिमाह रॉड्रिग्ज १५ चेंडूत २२ धावा केल्या ज्यात ३ चौकारांचा समावेश होता. हैदर नाइट वगळता बंगळूरच्या कोणत्याही गोलंदाजाला यश मिळाले नाही. आता बंगळूरला विजय मिळवण्यासाठी कर्णधार स्मृती मंधानाला मोठी खेळी करणे आवश्यक आहे.
बंगळूरुने चांगल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा समावेश आपल्या संघात केला आहे. ज्यामध्ये अॅलिस पेरी, हेदर नाइट आणि सोफी डिवाइनसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्याकडे मंधानाच्या रूपात चांगली कर्णधारही आहे. मंधाना (३.४० कोटी) लीगची सर्वात महागडी खेळाडू आहे. रिचा घोष असल्याने संघ भक्कम दिसत आहे. भारतीय खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ मजबूत वाटतो आहे.
दोन्ही संघांची प्लेईंग ११
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, दिशा कसाट, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (यष्टीरक्षक), कनिका आहुजा, आशा शोभना, प्रीती बोस, मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग.
दिल्ली कॅपिटल्स: शेफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), मारिजन कॅप, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस.