पुढील वर्षी रंगणाऱ्या फुटबॉलच्या महाकुंभमेळ्याचे बिगूल वाजले आहे. शुक्रवारी मध्यरात्री फिफा विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून यजमान ब्राझीलचा सलामीचा सामना १२ जून रोजी क्रोएशियाशी होणार आहे. सहाव्यांदा फिफा विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज असलेला ब्राझील संघ अ गटातून बादफेरीसाठी प्रबळ दावेदार समजला जात असला तरी त्यांना गटात मेक्सिको आणि कॅमेरून यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.
गतविश्वविजेता आणि २०१०च्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेला नेदरलॅण्ड्स हे संघ एकाच गटात असून त्यांना ब गटात चिली आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी लढत द्यावी लागेल. इटली, इंग्लंड आणि उरुग्वे हे फिफा विश्वचषक उंचावणारे संघ एकाच गटात असून इंग्लंडचा सलामीचा सामना इटलीशी होणार आहे. त्यांच्या ड गटात कोस्टा रिका संघाचाही समावेश आहे. बलाढय़ जर्मनीला ग गटात अमेरिका, पोर्तुगाल आणि घाना या संघांचा सामना करावा लागेल. प्ले-ऑफ फेरीद्वारे फिफा विश्वचषकाचे तिकीट मिळवणाऱ्या फ्रान्सला ई गटात इक्वेडोर, स्वित्र्झलड आणि होन्डुरास या संघांचे आव्हान पार करावे लागणार आहे. विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या ३२ संघांपैकी बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिना हा संघ पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. त्यांना अर्जेटिना, इराण आणि नायजेरिया या संघांचे आव्हान पेलावे लागणार आहे.
३२ संघांची आठ गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने ८ आणि ९ जुलै रोजी बेलो होरिझोन्टे आणि साव पावलो येथे होतील. अंतिम लढत रिओ डी जानेरो येथे १३ जुलैला होईल.
फिफा विश्वचषक स्पर्धेची गटवारी :
‘अ’ गट : ब्राझील, क्रोएशिया, मेक्सिको, कॅमेरून
‘ब’ गट : स्पेन, नेदरलॅण्ड्स, चिली, ऑस्ट्रेलिया
‘क’ गट : कोलंबिया, ग्रीस, आयव्हरी कोस्ट, जपान
‘ड’ गट : उरुग्वे, कोस्टा रिका, इंग्लंड, इटली
‘ई’ गट : स्वित्र्झलड, इक्वेडोर, फ्रान्स, होन्डूरास
‘फ’ गट : अर्जेटिना, बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिना, इराण, नायजेरिया
‘ग’ गट : जर्मनी, पोर्तुगाल, घाना, अमेरिका
‘ह’ गट : बेल्जियम, अल्जेरिया, रशिया, दक्षिण कोरिया

Story img Loader