श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय गोलंदाजांवर बरीच टीका होत आहे. या सामन्यात हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंगचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, पण अर्शदीपचे पुनरागमन वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हते. या सामन्यात अर्शदीप एकापाठोपाठ एक नो बॉल टाकत राहिला. ज्यामुळे त्याने एक नकोसा विक्रम केला आहे.
त्यामुळेच अनेकदा संपूर्ण ४ षटके टाकणाऱ्या अर्शदीपने या सामन्यात फक्त दोनच षटके टाकली. त्यानंतरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याबाबत माजी खेळाडू इरफान पठाणचे एक ट्विट चर्चेत आले आहे. ज्यामध्ये त्याने अर्शदीप सिंगला फटकारले आहे.
डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ही दोन षटके टाकली आणि एकूण ५ वेळा सीमा ओलांडली म्हणजेच ५ नो बॉल टाकले. अर्शदीपने त्याच्या पहिल्याच षटकात सलग तीन नो-बॉल टाकले, ज्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला आक्रमणातून वगळले. त्यानंतर १९ व्या षटकात त्याला परत आणले. मात्र, यावेळीही तोच किस्सा पाहायला मिळाला आणि या षटकातही अर्शदीपने संघर्ष सुरूच ठेवला. त्याने दुसऱ्या षटकात २ नो-बॉल टाकले. त्याने दोन षटकांच्या स्पेलमध्ये एकूण ३७ धावा दिल्या.
अर्शदीपच्या ५ नो-बॉल्समुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंनीही अर्शदीपच्या गोलंदाजीत सरावाची कमतरता असल्याचे नमूद केले. यादरम्यान इरफान पठाणची प्रतिक्रियाही समोर आली आहे. भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने थेट बोलताना ट्विट केले, त्याच्या चाहत्यांना ते खूप आवडले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत इरफानने लिहिले की, “कायद्यात राहिल्यास फायद्यात रहाल.”
अर्शदीप सिंगने केला अनोखा विक्रम –
अर्शदीप सिंग हा टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक नो-बॉल टाकणारा गोलंदाज आहे. अर्शदीपने त्याचाच विक्रम मोडला. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपने चार नो-बॉल टाकले होते. अर्शदीप सिंग टी-२० सामन्यात सर्वाधिक नो बॉल (फुल मेम्बर साइड) टाकण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आला आहे.
या प्रकरणात, त्याने २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५ नो बॉल टाकलेल्या वेस्ट इंडिजच्या कीमो पॉलची बरोबरी केली. तसेच याबाबतीत घानाने युगांडा विरुद्धच्या सामन्यात १० नो-बॉल टाकले होते. जे कोणत्याही संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जास्त आहे.