Ravichandran Ashwin reacts to the time out controversy: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारे बाद होणारा तो पहिला खेळाडू ठरला. बाद झाल्यानंतर मॅथ्यूज चांगलाच संतापला आणि सामना संपल्यानंतरही त्याने निराशा व्यक्त केली. यानंतर क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण आले. शाकिबने जे काही केले, ते नियमांनुसार केले, असा अनेकांचा समज आहे. त्याचवेळी, अनेकांनी मॅथ्यूजच्या हेल्मेटमध्ये बिघाड झाल्याचे सांगितले, हे कोणत्याही खेळाडूसोबत होऊ शकते. अशा स्थितीत बांगलादेशने त्याच्याविरुद्ध अपील करायला नको होती. यावर आता रविचंद्रन आश्विनने प्रतिक्रियाी दिली आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार मॅथ्यूज निर्धारित वेळेत क्रीजवर पोहोचला होता, पण पहिल्या चेंडूला सामोरे जाण्यापूर्वी तो त्याचे हेल्मेट घालत असताना, त्याचा पट्टा निघून गेला. त्यानंतर पंचांची परवानगी घेण्याऐवजी त्याने डगआऊटच्या दिशेने दुसरे हेल्मेट घेऊन येण्यासाठी इशारा केला. नियमानुसार, फलंदाजाने पहिल्या चेंडूला दोन मिनिटांत सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे, परंतु मॅथ्यूजला तसे करता आले नाही. अशा परिस्थितीत शाकिबच्या अपीलवर पंचांनी त्याला कोणताही चेंडू न खेळता बाद घोषित केले.
शुक्रवारी रविचंद्रन आश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना या प्रकरणारवर आपली प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये शाकिब श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गार्ड आणण्यास विसरला होता आणि त्याला ते आणण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यावर विरोधी संघांपैकी एकाही खेळाडूंनी टाईम आऊटची अपील केली नाही. मॅथ्यूजने निराश होणे योग्य असल्याचे मान्य केले, परंतु बांगलादेशच्या कर्णधाराला बाद करण्याबाबत अपील करण्याचा पूर्ण अधिकार होता.
अश्विन म्हणाला, “एक बाजू नियमांबद्दल बोलत आहे आणि दुसरी बाजू खिलाडूवृत्तीबद्दल बोलत आहे. जेव्हा मॅथ्यूज फलंदाजीला आला, तेव्हा त्याचे हेल्मेट खराब होते आणि त्याला ते बदलायचे होते. मी आणखी एक व्हिडीओ पाहिला, ज्यात शाकिबने श्रीलंकेविरुद्ध गार्ड आणले नव्हते आणि त्याला नंतर आणण्याची परवानगी दिली. हे जवळजवळ या दोन देशांमधील युद्धासारखे झाले आहे.”
अश्विन पुढे म्हणाला, “शाकिबने अपील केले आणि पंचांनी त्याला बाद घोषित केले, मी त्याच्याशी सहमत आहे. अलीकडेच अशा बातम्या आल्या होत्या की मॅथ्यूजला पंचांनी टाईम आऊटबद्दल आधीच ताकीद दिली होती. पण मॅथ्यूज तो आऊट झाल्यामुळे खरोखरच नाराज झाला होता, आणि ते योग्यच आहे. कोणीही अशा पद्धतीने बाद होऊ नये, प्रत्येकाला त्याचे वाईट वाटते.” अश्विनने नंतर खुलासा केला की, या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटी सामन्यात मैदानावरील पंचांनी टाइम-आउटची जाणीव करून दिली होती, जेव्हा तो सलामीच्या डावात नाईटवॉचमन म्हणून मैदानात उतरला होता आणि वेळ घालवण्यासाठी फिरत होता.
हेही वाचा – Ball Tampering: विश्वचषकादरम्यान न्यूझीलंडसाठी वाईट बातमी! अनुभवी फलंदाजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप
भारतीय फिरकीपटू म्हणाला, “मला सावकाश जायचे होते जेणेकरून ते शेवटचे षटक ठरेल आणि त्या दिवसाचा खेळ संपला, असे जाहीर केले जाईल. पण नंतर पंच मला म्हणाले, ‘तू थोडा उशीरा क्रीझवर आला आहेस. तुला माहित आहे का? जर त्यांनी अपील केली असती, तर मला तुला टाईम आऊट घोषित करावे लागले असते. हे ऐकून मला खरोखरच धक्का बसला होता,” ते म्हणाले, कारण त्यांचे मत होते की बर्याच संघांना अजूनही या नियमाची माहिती नाही.