चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघामध्ये ‘आयपीएल’च्या यंदाच्या सत्रातील जेतेपदासाठी लढाई होणार आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत प्रत्येकी तीन-तीन वेळा आयपीएल चषकांवर नाव कोरलं आहे. दोन्ही संघातील खेळाडू अंतिम सामन्याची तयारी करत आहेत. अशातच मुंबई इंडियन्स संघातील अष्चपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं ट्विट करत अंतिम लढतीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. एकप्रकारे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना या ट्विटमधून इशाराच दिला आहे.
हार्दिक पांड्याने ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत प्रतिस्पर्धी संघाला एकप्रकारे चेतावनीच दिली आहे. ही चेतावनी चेन्नई सुपर किंग्जला नक्कीच धडक भरविणारी आहे. त्याने ट्विट केले की, मी रॉयल लढाई करण्यासाठी सज्ज आहे. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या पंडय़ाकडून अंतिम फेरीतसुद्धा विजयवीराप्रमाणे खेळीची अपेक्षा आहे.
यंदाच्या सत्रात मुंबईला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात हार्दिकने सिंहाचा वाटा उचलला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात हार्दिकनं चमकदार कामगिरी करत संघाला जेतेपदापर्यंत नेहून ठेवलं आहे. आतापर्यत १५ सामन्यात ४९ च्या सरासरी आणि १९३च्या स्ट्राइक रेटने ३८६ धावा केल्या आहेत. यामध्ये ९१ धावांची सर्वोच्च खेळीचा समावेश आहे. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही हार्दिकने चुनूक दाखवली आहे. त्याने २७ च्या सरासरीने १४ खेळाडूंची शिकार केली आहे.
Ready for the battle royal pic.twitter.com/Ly7zjQTANk
— hardik pandya (@hardikpandya7) May 10, 2019
मुंबईने यंदाच्या हंगामात तीनदा चेन्नईला नामोहरम केले आहे. त्यामुळे मुंबईचे पारडे निर्विवादपणे जड मानले जात आहे. इतकेच नव्हे, तर उभय संघांमधील सामन्यांच्या विजयांची आकडेवारीसुद्धा मुंबईसाठी अनुकूल आहे. याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने चारपैकी तीन अंतिम फेरीचे सामने जिंकले आहेत. यापैकी दोन (२०१३ आणि २०१५) चेन्नईविरुद्ध जिंकले आहेत. दोन वर्षांच्या बंदीनंतर गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदासह ‘आयपीएल’मध्ये शानदार पुनरागमन केले. यंदाच्या हंगामातही तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईची कामगिरी वर्चस्वपूर्ण आहे. त्यामुळे या सामन्यात कोणताही संघ जिंकला, तरी ‘आयपीएल’ इतिहासाचा एक अध्याय लिहिला जाणार आहे.