दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने सोमवारी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. संधी मिळाल्यास कसोटीत भारताचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे बुमराहने म्हटले आहे. विराटबद्दल बुमराह म्हणाला, ”तो कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्यांसाठी लोकेश राहुलला मदत करेल आणि मोठे निर्णय घेण्यात योगदान देईल.”
बुमराह म्हणाला, ”माझ्यावर जी काही जबाबदारी पडेल ती स्वीकारण्यास मी तयार आहे. मला संधी मिळाली तर ते सन्मानाचे ठरेल. कोणता खेळाडू ते नाकारेल? मला कोणत्याही परिस्थितीत योगदान द्यायचे आहे, भूमिका कोणतीही असो.”
एकदिवसीय उपकर्णधाराच्या भूमिकेकडे तू कसा पाहतोस, या प्रश्नाचे उत्तर देताना बुमराह म्हणाला, ”मी उपकर्णधार झालो आहे पण माझी भूमिका बदललेली नाही. मी कर्णधार केएल राहुलला मदत करेन. गोलंदाजीत बदल करता येतील का, सामन्यात काय करता येईल, हे सगळे इनपुट मी देतो. उपकर्णधारपद मिळाले असले, तरी माझ्यावर कोणतेही दडपण नाही.”
हेही वाचा – IND vs SA : नवा कॅप्टन बोलत राहिला अन् विराट ऐकत राहिला..! BCCIनं शेअर केले PHOTO
विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याबाबत संघाला कसे सांगितले याबाबत बुमराह म्हणाला, ”केपटाऊनमधील सामन्यानंतर झालेल्या टीम मीटिंगमध्ये विराटने सर्व खेळाडूंना सांगितले की, तो कर्णधारपद सोडणार आहे. हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. त्यांचे शरीर किती तंदुरुस्त आहे आणि मानसिकदृष्ट्या किती तयार आहे हे त्याला माहीत आहे. विराटच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सर्व खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले.”