विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकापर्यंत झेप घेतल्याने मी आनंदी आहे. आता दोन आठवडे रंगणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय मी बाळगले आहे. १५ ऑगस्टला रंगणाऱ्या सायना नेहवालच्या लढतीविरुद्धची उत्सुकता मला आहे. भारताची अव्वल खेळाडू आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सायनाविरुद्ध लढण्यासाठी मी सज्ज आहे, असे मत अवध वॉरियर्सची ‘आयकॉन’ बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले. अवध वॉरियर्स आणि हैदराबाद हॉटशॉट्स यांच्यात १५ ऑगस्टला दिल्लीतील डीडीए बॅडमिंटन आणि स्क्वॉश स्टेडियममध्ये मुकाबला रंगणार आहे. त्यातील दुसरा सामना सायना वि. सिंधू असा रंगणार आहे. या लढतीविषयी सिंधू म्हणाली, ‘‘सायनाविरुद्धच्या लढतीसाठी मी उत्सुक आहे. या सामन्यात मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा खेळ चांगला होईल, अशी अपेक्षा आहे. आयबीएलमधील खडतर आव्हानांसाठी मी सज्ज झाले आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अनेक मातब्बर खेळाडूंवर मात केल्याने माझा आत्मविश्वास उंचावला आहे. आयबीएलमध्ये एकापेक्षा दिग्गज खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. येणारी प्रत्येक आव्हाने पेलण्यासाठी मी तयार आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा