आयपीएल पाठोपाठ चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहीत शर्माच्या आत्मविश्वात भर पडली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीला फलंदाजी करण्यास तयार असल्याचे रोहीतने म्हटले आहे.
गेल्या सहावर्षांपासून मी या संधीची वाट बघत होतो असेही रोहीत म्हणाला. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल नंतर आता चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. तसेच शिखर धवन सोबत भारतीय संघात सलामीला उतरून चांगली सुरुवातही त्याने आतापर्यंत केली आहे. त्यामुळे सलामीला फलंदाजी करण्याच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे रोहीतने स्पष्ट केले आहे. तसेच “सध्याचे क्रिकेट पाहता तुम्ही संघात कोणत्या जागी खेळता याला महत्व राहीलेले नाही. तुम्ही परिस्थिती ओळखून कामगिरी करणे महत्वाचे आहे. मी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्यास तयार आहे आणि लवकरच मला संधी मिळेल अशी आशा आहे.” असेही रोहीत म्हणाला.