अॅडलेड : अॅडलेड येथे प्रकाशझोतात (डे-नाइट) होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाबाबत सध्या बरीच चर्चा रंगते आहे. यशस्वी जैस्वालच्या साथीने केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यापैकी सलामीला कोण येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दोघांमध्ये सध्या राहुलचे पारडे जड मानले जात असले, तरी आपण कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार असल्याचे राहुलने सांगितले आहे. आपल्यासाठी केवळ अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळणे महत्त्वाचे आहे, असेही तो म्हणाला.
रोहितला काही दिवसांपूर्वीच अपत्यप्राप्ती झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियात उशिराने दाखल झाला. त्यामुळे त्याला पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत सलामीला येताना राहुलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. त्याने २६ आणि ७७ धावांची खेळी केली. तसेच दुसऱ्या डावात त्याने जैस्वालच्या साथीने द्विशतकी सलामीही दिली. आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अॅडलेड कसोटीसाठी रोहितचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोर फलंदाजी क्रमाचा पेच निर्माण झाला आहे.
‘‘सलामीला असो किंवा मधल्या फळीत, मला फरक पडत नाही. माझी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी आहे. माझ्या दृष्टीने केवळ अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवणे सर्वांत महत्त्वाचे आहे,’’ असे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल म्हणाला. तसेच अॅडलेड कसोटीत तुला कोणत्या क्रमांकावर खेळवले जाणार याची संघ व्यवस्थापनाने माहिती दिली आहे का, असा प्रश्न विचारला असता, ‘‘हो. मात्र, ही माहिती तुम्हाला (माध्यमांना) देण्यापासून मज्जाव घालण्यात आला आहे,’’ अशी मिश्कील टिप्पणी राहुलने केली.
हेही वाचा >>> 19 Asia Cup 2024 : टीम इंडिया यूएईवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत दाखल, वैभव-आयुषने झळकावली अर्धशतकं
राहुलने दशकभरापूर्वी ऑस्ट्रेलियातच कसोटी पदार्पण केले होते. त्याने कारकीर्दीची सुरुवात मधल्या फळीत खेळून केली होती, पण नंतर तो बरीच वर्षे सलामीला खेळला. त्यानंतर त्याने लय गमावली आणि त्याला दुखापतींचाही सामना करावा लागला. त्यामुळे त्याने सलामीचे स्थान गमावले. अलीकडच्या काळात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो मधल्या फळीत खेळत होता. मात्र, रोहितच्या अनुपस्थितीत त्याला पुन्हा सलामीला खेळता आले आणि त्याने संधीचे सोने केले.
‘‘आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मी विविध क्रमांकांवर फलंदाजी केली आहे. सुरुवातीच्या काळात मला फलंदाजी क्रमात होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणे अवघड जायचे. तांत्रिकदृष्ट्या नाही, पण मानसिकदृष्ट्या हे आव्हान वाटायचे. सुरुवातीचे २०-२५ चेंडू कशा पद्धतीने खेळले पाहिजेत? आक्रमक शैलीत खेळावे की सावध पवित्रा अवलंबला पाहिजे? असे विविध प्रश्न मला पडायचे. मात्र, आता गोष्टी बदलल्या आहेत. कसोटी आणि एकदिवसीत क्रिकेटमध्ये मी जवळपास सर्वच क्रमांकांवर फलंदाजी केली आहे. त्यामुळे कोणत्या क्रमांकावर कशी फलंदाजी करायची याचा पुरेसा अंदाज आला आहे. फलंदाजीतील क्रमाची आता मला जराही चिंता वाटत नाही,’’ असे राहुलने नमूद केले.
गुलाबी चेंडूविरुद्ध खेळणे आव्हानात्मक
● अॅडलेड येथे होणारा दुसरा कसोटी सामना प्रकाशझोतात (डे-नाइट) गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. लाल चेंडू आणि गुलाबी चेंडू यात बराच फरक असतो. गुलाबी चेंडूविरुद्ध खेळणे अधिक आव्हानात्मक वाटते, असे राहुलने सांगितले.
● गुलाबी चेंडू अधिक टणक वाटतो. केवळ फलंदाजी करतानाच नाही, तर क्षेत्ररक्षणादरम्यानही हे जाणवते. चेंडू अधिक वेगाने येतो आणि हाताला जोरात लागतो. तसेच गुलाबी चेंडू अधिक सीम आणि स्विंग होतो. त्यामुळे या चेंडूविरुद्ध खेळणे हे मोठे आव्हान असते. मात्र, मी त्यासाठी सज्ज आहे, असे राहुल म्हणाला