गॅरेथ बेलच्या चार गोलच्या जोरावर रिअल माद्रिदने १-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारत रायो व्हॅलेसानोवर १०-२ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर माद्रिदने (३३) ला लिगा फुटबॉल स्पध्रेत अव्वल स्थानावर असलेल्या बार्सिलोना (३५) आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद (३५) यांच्यातील गुणांचे अंतर कमी केले. सामन्याच्या सुरुवातीला डॅनिलोने (३ मि.) गोल करून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु अँटोनियो अ‍ॅमया (१० मि.) व जोझाबेड (१२ मि.) यांनी अवघ्या दोन मिनिटांच्या अवधीत दोन गोल करून रायो क्लबला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे माद्रिदच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. २५व्या मिनिटाला गॅरेथ बेलच्या गोलने हा संताप निवळला. सामना २-२ असा बरोबरीत आला. त्यानंतर ख्रिस्तीयानो रोनाल्डो (३० मि.) व  बेल (४१ मि.) यांनी गोल करून मध्यंतराला माद्रिदला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात करिम बेंझेमाने (४८ मि.) गोल करून यात भर टाकली. या सत्रात बेल (६१ व ७० मि.), बेंझेमा (७९ व ९० मि.) व रोनाल्डोने (५३ मि.) गोलचा पाऊस पाडून संघाचा १०-२ असा विजय निश्चित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real madrid 10 2 rayo vallecano la liga results