स्पॅनिश लीगच्या मोसमात सर्वोत्तम सुरुवात करण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी बार्सिलोनाने गमावली. ओसासुनाविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करल्यानंतर बार्सिलोनावर या मोसमात पहिल्यांदा सामना बरोबरीत सोडवण्याची वेळ आली. रिअल माद्रिदने मलगा संघावर २-० असा विजय मिळवला पण दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या गॅरेथ बॅलेला या सामन्यात आपली छाप पाडता आली नाही.
लिओनेल मेस्सीला या सामन्यासाठी सुरुवातीला विश्रांती देण्यात आल्यानंतर पाहुण्या बार्सिलोना संघातील खेळाडूंना पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवता आले नाही. नेयमार आणि सेस्क फॅब्रेगस यांनी दुसऱ्या सत्रात आक्रमक चाली रचून मलगा संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या अखेरीस मेस्सी मैदानात उतरला, पण त्यालाही संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
दरम्यान, रिअल माद्रिदने मलगावर २-० असा विजय मिळवून अव्वल क्रमांकावर असलेल्या बार्सिलोनाशी बरोबरी साधण्याकडे कूच केली आहे. बार्सिलोना २५ गुणांसह अव्वल स्थानी असून रिअल माद्रिद २२ गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अँजेल डी मारिया याने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला गोल करून रिअल माद्रिदला आघाडी मिळवून दिली. गॅरेथ बॅलेने सामन्याच्या अखेरीस मैदानात पुनरागमन केले. दुसऱ्या गोलमध्ये बॅलेची भूमिका महत्त्वाची ठरली. मलगाच्या वेलिंग्टनने गोलक्षेत्रात बॅलेला चुकीच्या पद्धतीने पाडल्यामुळे रिअल माद्रिदला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने गोल करून रिअल माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.