स्पेनला विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयश आले असले तरी या देशातील रिअल माद्रिद आणि बार्सिलोना हे दोन संघ पैशांच्या कमाईत मात्र ‘विजेते’ ठरले आहेत. जगातील दोन श्रीमंत क्रीडा फ्रेंचायझी म्हणून त्यांच्या नावांवर मोहोर उमटली आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रतिनिधित्व करीत असलेल्या युरो चषक विजेत्या रिअल माद्रिदला ‘फोब्र्ज’ या व्यापारविषयक मासिकाने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थान बहाल केले आहे. या संघाचे मूल्य ३.४४ अब्ज डॉलर्स इतके आहे. लिओनेल मेस्सी, नेयमार आणि आता लुइस सुआरेझचा समावेश असलेला बार्सिलोनाचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे सध्याचे मूल्य ३.२ अब्ज डॉलर्स आहे, तर इंग्लिश संघ मँचेस्टर युनायटेडसाठी (२.८१ अब्ज डॉलर्स) सरता फुटबॉल हंगाम जरी चांगला ठरला असला तरी त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
अव्वल दहा संघांमध्ये जर्मन विजेत्या बायर्न म्युनिकने मजल मारली आहे. १.८५ अब्ज डॉलर्स मूल्याचा हा क्लब सातव्या स्थानावर आहे. बास्केटबॉल आणि नॅशनल फुटबॉल लीगमधील अन्य संघांनाही अव्वल दहा संघांमध्ये स्थान मिळवता आले आहे. न्यूयॉर्क यांकीज (मूल्य २.५ अब्ज डॉलर्स) आणि डलास काऊबॉइज (मूल्य २.३ अब्ज डॉलर्स) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.
‘फोब्र्ज’च्या यादीतील अव्वल दहा
१. रिअल माद्रिद ३.४४ अब्ज डॉलर्स
२. बार्सिलोना ३.२ अब्ज डॉलर्स
३. मँचेस्टर युनायटेड २.८१ अब्ज डॉलर्स
४. न्यूयॉर्क यांकीज २.५ अब्ज डॉलर्स
५. डलास काऊबॉइज २.३ अब्ज डॉलर्स
६. लॉस एंजिल्स डॉजर्स २.० अब्ज डॉलर्स
७. बायर्न म्युनिक १.८५ अब्ज डॉलर्स
८. न्यू इंग्लंड पॅट्रियॉट्स १.८ अब्ज डॉलर्स
९. वॉशिंग्टन रेडस्किन्स १.७ अब्ज डॉलर्स
१०. न्यूयॉर्क जायंट्स १.५५ अब्ज डॉलर्स