रिअल माद्रिदने रायो व्हॅलेकानोचा २-० असा पराभव करत स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावरील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. १७व्या मिनिटालाच सर्जी रामोसला पंचांनी लाल कार्ड दाखविल्यामुळे रिअल माद्रिदला तब्बल ७२ मिनिटे १० जणांसह खेळावे लागले. पण अल्वारो मोराटा आणि सर्जी रामोस यांनी अनुक्रमे तिसऱ्या आणि १२व्या मिनिटाला गोल करून रिअल माद्रिदच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
रायो व्हॅलेकानो संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. करीम बेन्झेमाच्या जागी रिअल माद्रिदचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी मोराटाला संधी दिली. पण तिसऱ्या मिनिटालाच मेसूत ओझिलकडून मिळालेल्या पासवर गोलक्षेत्रात असलेल्या मोराटाने गोल झळकावून आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. रामोसने फ्री-किकचा फायदा उठवत माद्रिदसाठी दुसरा गोल केला. मात्र गोल झळकावल्यानंतर पाच मिनिटांच्या अंतराने रामोसला पंचांनी लागोपाठ दोन पिवळी कार्डे दाखवली, त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले.

Story img Loader