रिअल माद्रिद, अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि बार्सिलोना या स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल क्लबमध्ये विविध स्थानिक स्पर्धामध्ये रंगणारे द्वंद्व अंतिम टप्प्यात अधिक रंजक आणि रोमहर्षक बनत जाते, याची प्रचिती चाहत्यांनी अनेकदा अनुभवली. परंतु २०१५-१६च्या हंगामात बार्सिलोना अग्रेसर राहिला. सर्वाधिक चार जेतेपदांसह बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल क्षेत्रातील आपली मक्तेदारी पुन्हा सिद्ध केली. मात्र चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद पटकावण्याची संधी रिअल माद्रिद आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांना मिळाली आहे. जेतेपदाने यंदाच्या हंगामाचा निरोप घेण्यासाठी उभय संघ शनिवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
मिलान येथील सॅन सिरो येथे माद्रिद शहरातील कट्टर प्रतिस्पर्धी रिअल माद्रिद आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यात चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेचा अंतिम सामना रंगणार आहे.
आत्तापर्यंत १३ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करताना रिअलने सर्वाधिक दहा जेतेपद पटकावली आहेत, तर अ‍ॅटलेटिकोने दोनवेळा ही किमया साधली असून त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात जेतेपद निश्चित करण्याचा त्यांचा मानस आहे.

Story img Loader